पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण देशामध्ये सापडल्याने वैद्यकीय विभागाची डोकेदुखी पुन्हा वाढली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागानेही कोरोनाला रोखण्यासाठी तयारी केली आहे. नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय विभागाने रुग्णालये व वैद्यकीय यंत्रणा सज्ज केली आहे.

गेल्या वर्षभरापासून शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सद्य:स्थितीत शहरामध्ये बाधितांची संख्या एक अंकी आहे. मात्र, चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रसार झपाट्याने होऊ लागला आहे. त्याच व्हेरियंटचे रुग्ण देशातील काही भागांमध्ये सापडल्याने पुन्हा मास्कसक्ती होण्याची शक्यता आहे, तसेच येऊ घातलेल्या या नव्या व्हेरियंटला अटकाव करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा कामाला लागली आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेत नुकतीच बैठक पार पडली. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शहरातील सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांची कोविड चाचणी केली जाणार आहे. तसेच दैनंदिन तपासणीमध्येदेखील वाढ करण्यात येणार आहे. शहरातील वायसीएम, जिजामाता, थेरगाव, भोसरी व आकुर्डी रुग्णालयामध्ये बेड तयार ठेवण्यात येणार आहेत. त्यासोबतच चारही रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्रवाही करणाऱ्या लाइनचे काम पूर्ण झाले आहे. व्हेंटिलेटर, तसेच इतर यंत्रणा सुस्थितीत आहेत. रुग्णांसाठी लागणारा औषधांचा साठा वैद्यकीय विभागाकडे आहे.
दैनंदिन अहवालामध्ये बाधित आढळलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. बाधितांना क्वारंटाईन करण्याची यंत्रणादेखील सज्ज आहे. नव्या व्हेरियंटला नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करावी, तसेच मास्क, सॅनिटायजर, तसेच सामाजिक अंतराचे पालन करण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.
Tags: Corona New VariantCoronavirus Update NewsPcmc CoronaPcmc corona updatePimpri Chinchwad Municipal Corporation