पिंपरी (Pclive7.com):- अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी हेल्मेटवर असणारा १८ टक्के जी.एस.टी केंद्र सरकारने कमी करावा किंवा बंद करावा म्हणजे सर्वसामान्य दुचाकी स्वार अधिक प्रमाणात हेल्मेटची खरेदी करू शकतील. यामुळे काही प्रमाणात तरी अपघातातील मृतांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल असे मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रातून मागणी केली आहे.

अण्णा जोगदंड पुढे म्हणाले, भारतात वाहनांची संख्या अधिक वेगाने वाढत आहे, केंद्र सरकारने कारचे उत्पादन करणाऱ्या आस्थापनांना सीटबेल्ट सह अनेक सुरक्षितेच्या दृष्टीने उपयोजना करण्यासाठी बंधने घातली आहेत, आगामी काळात याचा सकारात्मक परिणामही आपणास दिसून येणार आहे. केंद्र सरकारने दुचाकीचे अपघात कमी करण्यासाठी आणि मनुष्यहानी टाळण्यासाठी हेल्मेटवरील जी.एस.टी माफ करून केंद्र सरकारने प्रबोधन करण्याची मागणी जोगदंड यांनी केली आहे.
निवेदनावर संस्था अध्यक्ष विकास कुचेकर, शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा. सौ संगीता जोगदंड, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, सचिव धाराशिवकर गजानन सहसचिव ॲड. सचिन काळे यांच्या सह्या आहेत.