(संदेश पुजारी, Pclive7.com):- पिंपरी चिंचवड मध्ये तीन विधानसभा मतदार संघ येत असले तरी शहरात सर्वाधिक ‘लक्षवेधी’ मतदारसंघ म्हणून भोसरी मतदार संघ पाहिले जाते. अर्थात त्याला कारण आहे इथले प्रतिस्पर्धी.. भोसरी म्हटले की नाव समोर येते ते विलास लांडे यांचे….! पिंपरी चिंचवडचे शरद पवार म्हणून ओळख असलेल्या लांडे यांचे ‘डावपेच’ नेमके काय? हे अनेकांना कोडे असते म्हणून या मतदार संघाकडे सर्वांचेच लक्ष असते..! पण त्यांच्या या डावपेचाला मागच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या आमदार महेश लांडगे यांनी ‘छेदले’ आणि अशक्यप्राय वाटणारा विजयश्री खेचून आणला.. त्याचमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते समोरासमोर आले तर राजकीय वातावरण पुरते तापणार यात शंका नसल्याने हा मतदार संघ कमालीचा लक्षवेधी ठरतोय..भोसरी विधानसभा मतदार संघातले आणखी एक नाव म्हणजे शिवसेना नेत्या सुलभा उबाळे…! शहरातला शिवसेनेचा एकमेव महिला चेहरा…! महेश लांडगे आणि विलास लांडे यांच्या सारख्या कडव्या प्रतिस्पर्ध्यांना तेवढ्याच धैर्याने त्यांनी तोंड दिले..! पण दुर्दैवाने त्यांना दोन वेळेला पराभवाचा सामना करावा लागला. आता महापालिका निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने आणि या पूर्वी दोनवेळा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांच्या नावाचा आगामी निवडणुकीत शिवसेना नेते किती विचार करतील हे सांगता येणे अवघड आहे. त्याचमुळे भोसरी मतदारसंघात सध्या लांडे आणि लांडगे हिच लढत होईल अशी चर्चा आहे.
विद्यमान आमदार असल्याने महेश लांडगे यांचे पारडे आजतरी सरस आहे. त्यातच पैलवानी आणि सर्वांमध्ये सहज मिसळून जाण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळे त्यांची लोकप्रियता ही जास्त आहे. निवडणुकांमध्ये प्रत्येकाला सामोरे जावे लागतो तो ‘अँटीइन्कमबन्सी’चा फटका ही त्यांना बसताना दिसत नाही. हे सर्व खरे असले तरी त्यांना विलास लांडे यांच्या सारख्या अत्यंत ‘चाणाक्ष’ विरोधकाचा सामना करावा लागणार आहे. मुळात पराभूत झाल्यानंतर विलास लांडे कमालीचे शांत आहेत, पण त्यांची ही शांतताच खरे तर अनेकांना ‘धडकी’ भरवणारी आहे..! त्यातच ‘दूध पोळले की माणूस ताक ही फुंकून पितो’ या म्हणी प्रमाणे त्यांनी झालेल्या चूका दुरुस्त करायला सुरुवात केली आहे. महेश लांडगे यांच्यासाठी आणखी एक अडचण म्हणजे मागील निवडणुकीत लांडे यांच्यावरच्या नाराजीमुळे सर्वपक्षीय नगरसेवक कार्यकर्त्यांनी लांडगे यांना मदत केली होती, त्याला भावनिक किनार ही होती. पण आता मात्र लांडगे यांना अन्याय झाल्याची ती भावनिक किनार नसणार आहे..! त्यामुळे लोकप्रियतेत अधिक असले तरी लांडगे यांनी निवडणूक गृहीत धरावी एवढी ती सोपी नसणार आहे.. पण हे झाले विधानसभा निवडणुकीत महेश लांडगे भाजपाकडून आणि विलास लांडे राष्ट्रवादी कडून लढले तर..! जर महेश लांडगे लोकसभेला गेले आणि भाजपकडून सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार निवडणुकीत उतरले तर मात्र चित्र वेगळे असणार आहे.. आणि सगळ्यात महत्वाचे विलास लांडे राष्ट्रवादीतूनच लढणार याची खात्री ते स्वतः देऊ शकत नाहीत तर तिथे इतरांचे काय…? असा सवाल उपस्थित होतो. म्हणूनच विधानसभा निवडणुकात भोसरीमध्ये घडणार काय याचा अंदाज कोणी ही बंधू शकणार नाही हे ही तितकेच खरे…!