पिंपरी (Pclive7.com):- इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या वतीने तळेगाव दाभाडेच्या काही अंतरावर दुर्गम भागात असलेल्या निगडे येथील प्रतीक विद्या निकेतन शाळेला शैक्षणिक साहित्य, स्वच्छतागृह, ग्रंथालय, सायन्स लॅब उपलब्ध करुन दिले. तसेच विद्यार्थ्यांना करिअर, स्वच्छता, आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. स्वच्छतेविषयी निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे प्रतीक विद्या निकेतन शाळा ‘आनंदी शाळा’ म्हणून घोषित करण्यात आली.
प्रतीक विद्या निकेतन शाळेच्या प्रांगणात आज झालेल्या या कार्यक्रमाला इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन सावित्री रघुपती, इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा सविता राजापुरकर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. कृष्णकांत वाढवकर, उपाध्यक्ष खळदे, सचिव दत्तात्रय बाळसराफ, संचालक पवार, इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट आएसओ मुक्ती पानसे, सचिव सुमन शिरुर, क्लबचे सर्व माजी अध्यक्ष आदी उपस्थित होते.
तळेगाव दाभाडेच्या पुढे ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या निगडे या गावात प्रतीक विद्या निकेतन शाळा आहे. या शाळेला इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे शाळेच्या आवारात सर्व विद्यार्थ्यांसाठी शौचालय, ग्रंथालय, सायन्स लॅब, वॉश सेंटर, पुस्तके, वह्या, खेळाचे साहित्य, वॉशबेसिन उपलब्ध करुन देण्यात आले. तसेच शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
विद्यार्थ्यांना करिअर, स्वच्छता, आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच स्वच्छतेविषयी दोन गटामध्ये निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. लहान गटातून अर्जुन थापा हा विजेता ठरला. त्याने स्वच्छतेसोबतच राजकीय नेत्यांच्या स्वच्छतेची गरज आहे, याबाबत उत्कृष्ट निबंध लिहिला होता. त्याच्या या निबंधाला इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या माजी अध्यक्षा प्रणिता आलुरकर यांनी ५०० रुपयांचे बक्षीस जाहीर केले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्राची लालगुडे, आदित्य शेटे, प्रतीक्षा दळवी, गौरी घोलप, दिव्या कोळवडे यांना सावित्री रघुपती यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
आनंदी शाळा करण्यासाठी विशेष सहकार्य केलेल्याबद्दल शाळेचे प्राचार्य मांडे सर आणि रो.हरबिंदर दुल्लर यांचा इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा सविता राजापुरकर यांनी विशेष सत्कार केला.
सविता राजापुरकर म्हणाल्या, “या शाळेला मदत करण्यास इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडला अत्यंत आनंद होत आहे. शाळेतील मुलांना सर्व सोयीसुविधा पुरविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण, सुविधा मिळणे अत्यंत गरजेचे आहे. २२ ते २७ नोव्हेंबर दरम्यान इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे मुलांसाठी सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रशिक्षणात १०० हून अधिक मुले सहभागी होणार आहेत”
संस्थेचे सचिव दत्तात्रय बाळसराफ म्हणाले, अतिशय दुर्गम भागात येऊन इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या महिलांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. शाळेला केलेल्या मदतीबाबत त्यांनी इनरव्हील क्लबच्या पदाधिका-यांचे आभार मानले.