पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचा ‘अजब’ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. एकाच कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिकेची चक्क तिसर्यांदा छापण्यात आली आहे. गुणवंत शिक्षक पुरस्काराच्या निमंत्रण पत्रिकेवर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचेच नाव छापण्याचे राहिल्यामुळे ‘पळापळ’ करून पुन्हा नव्याने निमंत्रणपत्रिका छापली आहे. गेल्या महिन्यात कार्यक्रमपत्रिका छापून ऐनवेळी कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात येतो. १७ ऑक्टोबर रोजी गुणवंत शिक्षकांचा सन्मान आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांच्या हस्ते आणि महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात केला जाणार होता. कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका छापली गेली. पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, पत्रकार आदींना त्या पत्रिका वाटल्या गेल्या; मात्र ऐनवेळी तो कार्यक्रम रद्द झाला. आता येत्या रविवारी दि.५ नोव्हेंबर रोजी शिक्षकांचा सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिका छापून त्या अधिकारी, नगरसेवकांना वाटल्या गेल्या. मात्र, पुन्हा त्यात एक चूक झाली. या निमंत्रण पत्रिकेवर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचेच नाव टाकण्याचे राहून गेले.
प्रोटोकॉलनुसार निमंत्रण पत्रिकेवर पालकमंत्र्यांचे नाव टाकणे गरजेचे असते. मात्र, भाजपचे पदाधिकारीच पालकमंत्र्यांचे नाव टाकण्याचे विसरल्याची चूक लक्षात आल्यानंतर पुन्हा नव्याने निमंत्रण पत्रिका छापली गेली, त्यामुळे शिक्षकांचा पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका एकूण तीन वेळा छापली गेली आहे. यावर मोठ्या प्रमाणात खर्च झाला असून जनतेच्या पैशाची खुलेआम उधळपट्टी सुरू असल्याने प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.