पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर महापालिकेकडून कारवाई सुरु केली आहे. आज पुणे-नाशिक महामार्ग येथील अनधिकृत वीट बांधकाम असलेले काळूबाईचे मंदिर भुईसपाट केले.
अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई सुरु केली आहे. शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे धार्मिक स्थळे उभी आहेत. काही अनधिकृत मंदिरे स्थलांतरित केली आहेत. तर, काही ठिकाणी अनधिकृत धार्मिक स्थळे तशीच आहे. या धार्मिक स्थळावंर पालिकेने कारवाई सुरु केली आहे.
महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व नियंत्रण विभागाने पुणे-नाशिक महामार्ग येथील वीट बांधकाम असलेले काळूबाईचे मंदिर भुईसपाट केले. त्याचबरोबर बो-हाडेवाडी मधील संभाजीनगर कॉलनी नंबर एक येथील एका अनधिकृत बांधकामावर देखील कारवाई करण्यात आली. कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, दोन जेसीबी, दोन डंपरच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.