पिंपरी (Pclive7.com):- गेल्या २० दिवसांपासून फरार असलेले पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपचे नगरसेवक तुषार कामठे हे आज (गुरुवार) पोलिसांसमोर हजर झाले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
तुषार कामठे यांच्याविरुद्धच्या गुन्ह्यात काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. त्यानुसार गेल्या महिन्यात २७ ऑक्टोबर रोजी हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. साठे हे महापालिका निवडणुकीत कामठे यांचे प्रतिस्पर्धी होते. बनावट दाखल्याच्या आधारे त्यांनी महापालिका निवडणुकीत खोटी शैक्षणिक माहिती सादर केल्याचा आरोप आहे.
सत्र न्यायालय व नंतर मुंबई उच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन फेटाळल्याने कामठे यांना सरेंडर होण्याशिवाय पर्यायच राहिला नव्हता. त्यानुसार ते सकाळी हजर झाले, असे सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय चांदखेडे यांनी सांगितले. त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. तसेच त्यांची पोलिस कोठडीही मागणार असल्याचे चांदखेडे यांनी सांगितले. पोलिस अधिकाऱ्याने कबूल केले. तीन महिने महापालिका सभेला गैरहजर राहिले, तर नगरसेवकपद रद्द होते. त्यामुळे ते वाचविण्यासाठी कामठे हजर झाल्याचे समजते.





















Join Our Whatsapp Group