पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. निवडणुकीत बनावट कागदपत्रे सादर केल्या प्रकरणी त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात होता. आज कामठे स्वत: सांगवी पोलीस ठाण्यात हजर झाले होते. त्यानंतर त्यांना पिंपरी न्यायालयासमोर हजर केल्यानंतर २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
तुषार कामठे यांच्याविरुद्धच्या गुन्ह्यात काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. त्यानुसार गेल्या महिन्यात २७ ऑक्टोबर रोजी हा गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. साठे हे महापालिका निवडणुकीत कामठे यांचे प्रतिस्पर्धी होते. बनावट दाखल्याच्या आधारे त्यांनी महापालिका निवडणुकीत खोटी शैक्षणिक माहिती सादर केल्याचा आरोप कामठे यांच्यावर आहे.
न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर बोलताना तुषार कामठे यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास असून लवकरच सत्य समोर येईल. सलग तीन वेळा पराभवाला सामोरे गेल्यामुळे सचिन साठे यांनी माझ्याविरोधात केलेल हे षडयंत्र असल्याचे मत कामठे यांनी व्यक्त केले आहे.