पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे भाजप नगरसेवक तुषार हिंगे यांच्याविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात ते फरार असून अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. मात्र, त्यांनी सादर केलेला रजेचा अर्ज महापालिकेच्या विधी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. तुषार हिंगे यांच्या सहीचा अर्ज महापालिकेपर्यंत व्यवस्थितरित्या पोहचला, पण पोलीस त्यांच्यापर्यंत पोहचू शकत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
भाजप नगरसेवक हिंगे यांच्या विरुध्द पोलिसांत खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणी त्यांना पोलिसांकडून अजूनही अटक झालेली नाही. ते अद्याप फरार आहेत. मात्र, फरार असलेल्या हिंगे यांनी १३ नोव्हेंबर २०१७ रोजी विधी समिती सभापती यांच्याकडे रजा मंजुरीचा अर्ज सादर केला आहे. त्यामध्ये आपण न्यायालयीन कामकाजासाठी बाहेरगावी असल्याने महापालिकेच्या नोव्हेंबर व डिंसेबर महिन्यातील सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकत नाही. ही रजा मंजूर करण्याची विनंती त्यांनी केली होती. त्यानुसार विधी समितीने त्यांचा अर्जाचा प्रस्ताव ऐनवेळी दाखल करून घेत ही रजा मंजूर केली आहे.
दरम्यान, हिंगे यांनी स्वत:चा अर्ज महापालिकेच्या विधी समिती सभापतीपर्यंत पोहचवला. मात्र, पोलीस यंत्रणा हिंगे यांच्यापर्यंत पोहचू शकत नाही. याबाबच आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच, दोन महिन्यांची रजा मंजूर केल्याने हिंगे इतके दिवस पोलिसांपासून फरार राहणार का, असा प्रश्न देखील उपस्थित होतो आहे.






















Join Our Whatsapp Group