पुणे (Pclive7.com):- कोथरूड येथील प्रस्तावित शिवसृष्टी संदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन महापौर मुक्त टिळक यांनी दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री ५ वेळा पुण्यात येऊन गेले. मात्र, शिवसृष्टीबाबत कोणताही निर्णय झाला नाही. शिवाय पालकमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीमध्येही काहीच ठोस निर्णय झाला नाही, असा आरोप करत ‘येत्या महिन्याभरात शिवसृष्टीसंदर्भात ठोस निर्णय घ्या, अन्यथा मेट्रोचे काम बंद पाडू,’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी दिला आहे. त्यांना काँग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी पाठिंबा देत शिवसृष्टी साकारण्यासाठी पावले उचलण्याची मागणी केली.
आज शिवसृष्टीबाबतच्या खास सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मानकर बोलत होते. प्रस्तावित शिवसृष्टीच्या जागेवर मेट्रो स्टेशनचे आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यामुळे या जागेवर मेट्रो होणार की शिवसुष्टी असा प्रश्न उपस्थित झाला होता. येथे मेट्रो स्टेशन होणार हे निश्चित झाल्यानंतर प्रस्तावित ठिकाणीच शिवसृष्टी झाली पाहिजे, अशी भूमिका विरोधकांनी घेतल्यानंतर या जागेवर मेट्रो स्टेशनसह शिवसृष्टी साकारण्याचा प्रस्तावर महामेट्रोने मांडला होता. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुढाकार घेऊन मुंबईत मेट्रोचे अधिकारी आणि महापालिकेतील पदाधिकारी यांची बैठक घडवून आणली होती.
या बैठकीत २८ एकर जागेवर मेट्रो स्थानक आणि शिवसृष्टी असे दोन्ही प्रकल्प साकारण्यासाठी तंत्रज्ञांमार्फत चाचपणी करण्याचे ठरविण्यात आले होते. मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी, काही तंत्रज्ञ आणि पालिका पदाधिकारी यांची संयुक्त बैठक लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत घेण्याचा निर्णय त्यावेळी जाहीर करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौर्यावर गेल्याने बैठक झालीच नाही. त्यानंतर महापौर टिळक यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बोलून येत्या महिनाभरात यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते. हे आश्वास दिल्यानंतर बैठक घेण्यासंदर्भातच अद्याप कोणतीही हालचाल झाली नाही.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसृष्टी या विषयावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली होती. यावेळी दीपक मानकर यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. पोकळ आश्वासन देऊन तोंडाला पाने पुसण्यापेक्षा ठोस पावले उचलण्याची मागणी यावेळी विरोधी पक्षनेते चेतन तुपे आणि शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी केली. महापौरांनी शिवसृष्टीचा प्रश्न मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्गी लावण्याचे आणि मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेण्याचे आश्वासन देऊन महिना उलटून गेला. तरीही या विषयावर हालचाल होत नसल्याचे आरोप करत, ठोस निर्णय न घेतल्यास मेट्रोचे काम बंद पाडू, असा इशारा मानकर यांनी दिला. निवडणुकीच्या आधी भाजपने सिंहगडावर शपथ घेतली. मात्र, निवडून आल्यापासून शिवसृष्टीविषयी कोणतीच हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे यापुढे थेट रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशारा काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी दिला आहे.






















Join Our Whatsapp Group