पिंपरी (Pclive7.com):- हल्ली सहकाराकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला नाही. सरकार सुद्धा सहकाराकडे वक्र दृष्टीने पाहते. सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर सहकार ही जनसामान्यांच्या जिव्हाळ्याची गोष्ट ठरु शकते, असे मत महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या विशालनगर, पिंपळे निलख या बाराव्या शाखेचे उद्घाटन दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक तुकाराम गुजर होते. बँकेचे अध्यक्ष कांतीलाल गुजर, उपाध्यक्ष गबाजी वाकडकर, नगरसेवक नाना काटे, तुषार कामठे, आरती चोंधे, ममता गायकवाड, परिवहन समितीचे माजी सभापती दिलीप बालवडकर, सुरेश चोंधे, विलास कामठे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, ज्येष्ठ संचालक श्रीधर वाल्हेकर, लक्ष्मण काटे, अंकुश पऱ्हाड ,सुरेश पारखी, संजय पठारे, माजी नगरसेवक धनराज बिर्दा, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मुरकुटे, बाळासाहेब इंगवले आदी उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले, ‘सरकारी बंधने वाढत चालली आहेत. एकाही जिल्ह्यात भू विकास बँका चालू नाहीत. अनेक जिल्हा सहकारी बँका अडचणीत आहेत. याकडे लक्ष वेधत सहकारी संस्था टिकल्या पाहिजेत. वाढल्या पाहिजेत. जगल्या पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली’. यशवंतराव चव्हाण, धनंजयराव गाडगीळ, वसंतदादा पाटील, शरदचंद्र पवार यांनी सहकार चळवळ वाढवली. ग्रामीण भागातील गरीब माणसाला वेळीच मदत झाली पाहिजे या भावनेतून गावची डेअरी, कार्यकारी सोसायटी, दूध संघ, पतसंस्था, बँका, साखर कारखाने, सूत गिरण्या स्थापन झाल्या. या माध्यमातून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न झाले.
वळसे पाटील पुढे म्हणाले, आपण वर्तमानपत्रात वाचतो की देशातील राष्ट्रीयकृत बँकांची थकबाकी दीड लाख कोटींपेक्षा जास्त आहे. एनपीए मोठ्या प्रमाणात आहे. बड्या उद्योगपतींनी मोठ्या प्रमाणावर कर्जे घेतली आहेत. ते परतफेडीचे नाव घेत नाहीत. या सरकारी बँकांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकार करदात्यांच्या पैशांतून त्यांना मदत करते. अशा प्रकरणात कोणत्याही अध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच अधिकारी यांच्यावर कारवाई होत नाही. बँकांबरोबरच मोठ्या कर्जदारांच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. कितीही कर्जे थकविली तरी त्यांना नवीन कर्ज मिळतात. अशी परिस्थिती असली तरीही स्थापन केलेल्या सहकारी संस्था टिकल्या पाहिजेत. त्यासाठी सहकारात काम करीत असलेल्या सर्वांनीच आपल्या संस्थेची पत टिकविणे व विश्वासार्हता वाढविली पाहिजे. सहकाराबाबत सरकार सरकारचे काम करेल. परंतु जनसामान्यांच्या हिताचे काम करणे हे आपले कर्तव्य आहे.
संचालक श्रीधर वाल्हेकर, लक्ष्मण काटे, अंकुश पऱ्हाड, सुरेश पारखी, संजय पठारे, संतोष मुंगसे , संदीप पवार, राजाराम रंदील, चंद्रभागा भिसे, मीना शेळके, सुजाता पारखी, उमेश आगम, राजेंद्र शिरसाठ, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी सभासद व खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंकुश पऱ्हाड यांनी स्वागत केले. दत्ता उबाळे यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रभागा भिसे यांनी आभार मानले.





















Join Our Whatsapp Group