पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक 28 रहाटणी, पिंपळे सौदागर मधील कुणाल आयकॉन रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात काटे यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक 28 रहाटणी पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रस्ता हा विविध खोदकामामुळे खूप खराब झाला. या रस्त्यावर खूप खड्डे पडलेले असून रस्ता खिळखिळीत झाला आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे वारंवार छोटे मोठे अपघात होत असतात. महापालिकेतर्फे या रस्त्याची वारंवार तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी केली जाते. परंतु, पुन्हा काही कामासाठी रस्ता खोदला जातो. रस्त्याची परिस्तिथी जैसे थे होते, संपूर्ण पिंपळे सौदागर मधील मुख्य रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे झाले असून हा रस्ता शासकीय निविदेत अडकला आहे.
हा रस्ता कोणत्या विभागाने करायचा या प्रशासन निर्णयात रस्त्याचे काम रखडले आहे. तसेच या रस्त्यासंदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत कळाले कि या रस्त्याचे काम 2024 ला सुरु करणार आहेत. मग या रस्त्यावरील खड्यामुळे मोठा अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण..? कुणाल आयकॉन रस्ता खूप रहदारीचा व वर्दळीचा आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात निवासी सोसायट्या, शाळा, व्यावसायिक दुकाने आहेत त्यामुळे हा रस्ता खूप महत्वाचा आहे, पावसाळा काही दिवसांवर आला असून शाळा देखील चालू होणार आहेत. कुणाल आयकॉन रस्त्यावर खूप प्रमाणत खड्डे पडलेले असून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण रस्त्याचे डांबरीकारण करण्यात यावे असे नाना काटे यांनी म्हटले आहे.