पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरात तीन हजारपेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दीड हजारपेक्षा अधिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. गणेशोत्सव कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर येते. पिंपरी-चिंचवड शहरात गणेशोत्सवासाठी बाहेरून बंदोबस्त मागवण्यात आला आहे.
गणेशोत्सवासाठी एक अपर पोलीस आयुक्त, पाच उपायुक्त, आठ सहायक आयुक्त, ५० पोलीस निरीक्षक, १४५ सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक, एक हजार ८४० अंमलदार एवढे मनुष्यबळ उपलब्ध आहे. चार पोलीस निरीक्षक, २० सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक, ४०० पोलीस कर्मचारी, ६०० होमगार्ड, एसआरपीएफच्या दोन कंपनी, श्वान बॉम्ब शोधक आणि नाशक विभागाची दोन पथके ही अधिकची कुमक शहर पोलिसांना मिळाली आहे.
गणेशोत्सव कालावधीत पाच दिवस रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक लावण्यासाठी परवानगी दिली आहे. २३ ते २८ सप्टेंबर या दिवशी ही परवानगी असेल. सातव्या दिवशी अनेक भागातील विसर्जन होते. मात्र, त्या दिवशी ध्वनिक्षेपक वापरण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे रात्री दहा वाजता ध्वनिक्षेपक बंद करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.