पिंपरी (Pclive7.com):- भारतीय सैन्याला सलाम करण्यासाठी ‘मराठा वॉरियर्स’ची सायकलवारी पुणे ते वाघा बॉर्डरला रवाना झाली. खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत या दहा धाडसी तरूणांच्या टीमचा आज सकाळी सायकल प्रवास सुरू झाला.
‘मराठा वारियर्स’मध्ये राम फुगे, निलेश धावडे, विश्वास काशिद, प्रज्ञेश मोळक, प्रशांत जाधव, संतोष दरेकर, बजरंग मोळक, विजय हरगुडे, संदीप शिंदे व आठ वर्षीय अंशुमन धावडे अशा या ध्येयवेड्या तरुणांचा मोहिमेत सहभाग आहे.
भोसरीतील कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथून या सायकलवारीचा शुभारंभ झाला. खासदार छत्रपती संभाजीराजे, महापौर नितीन काळजे, माजी आमदार विलास लांडे, शेकापचे नेते प्रविण गायकवाड, पुणे महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक अजित गव्हाणे, नगरसेविका भीमाताई फुगे, विनया तापकीर, उद्योजक कार्तिक लांडगे, पवना सहकारी बँकेचे संचालक शामराव फुगे, कामगार नेते हनुमंत बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठा वॉरियर्सचे प्रमुख राम फुगे म्हणाले की, प्रत्येक वेळी काही तरी नवीन करायचं ठरवलं होत. ३ वर्षापूर्वी पुणे ते सिंगापूर बाईकवर प्रवास केलाय. तसेच पुणे ते लेह लद्दाख प्रवास केलाय. ध्येय गाठतोय त्याचं खूप समाधान आहे. मराठी माणसं सैन्यात मोठ्या पदावर पोहचली पाहिजेत त्यासाठी या प्रवासा दरम्यान संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहे. तब्बल २ हजार किलो मीटरचा २१ दिवसांचा हा प्रवास आहे. या मोहिमेसाठी गेल्या सहा महिन्यांपासून तयारी चालू होती. त्यात फिटनेसवर विशेष लक्ष दिले.
मराठा वारियर्स या समुहाने सीमेवर लढा देणाऱ्या भारतीय सैन्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व पंजाब अशा ४ राज्यातून १८ दिवस प्रवास करुन हे १० सायकलस्वार २ हजार किमी अंतर पूर्ण करणार आहेत. या तरुणांच्या मार्गावर येणाऱ्या शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन तेथील तरुणांना ‘भारतीय लष्कारामधील संधी’ यावर प्रबोधन कराणार आहेत. याच बरोबर सायकल व आरोग्याचे महत्त्व पटवून देणार आहेत.