पिंपरी (Pclive7.com):- किसान मालिकेतील २७ व्या कृषिप्रदर्शनाचे पुण्यात मोशी येथे उद्घाटन करण्यात आले. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे पहिल्या येणार्या शेतकर्यांच्या गटातर्फे हे उद्घाटन करण्यात आले.यामध्ये पिंपरीचे चंद्रकांत बबन कुदळे, मोशीचे दत्तूभाऊ वराडे, पांडूरंग विष्णू बोर्हाडे, संदीप बोर्हाडे, बोराडवाडीचे तानाजी ओझरकर, जुन्नरचे सतीश शिंदे, मोशीचे योगेश व तुषार सस्ते, बीडच्या मंगल वैरागी,जुन्नरचे सोपान पांडुरंग घोलप आणि मोशीचे संजय हजारे या शेतकर्यांचा समावेश होता. हे प्रदर्शन दिनांक १३ ते १७ डिसेंबर दरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत सुरू राहील.
किसान २०१७ ला कृषि मंत्रालय, भारत सरकार यांचा सक्रिय सहभाग व सहयोग लाभला आहे. पुणे आकाशवाणी हे माध्यम सहयोगी आहेत. आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकर्यांपर्यंत पोहोचविणे हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
१५ एकर प्रदर्शन क्षेत्रावर ५०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नव उद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करतील. प्रदर्शनात, ५ दिवसांमध्ये देशभरातून सुमारे १ लाखाहून अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे.
यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका व शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ठ विभागातील स्टॉल शेतकर्यांना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत केले आहे. पाण्याचे नियोजन व सिंचनासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार्या १०० हून अधिक कंपन्यांचा सहभाग हे किसान प्रदर्शनातील मुख्य आकर्षण असेल.
कृषी क्षेत्रातील नवउद्योजकांसाठी खास दालन स्पार्क : या वर्षी किसान प्रदर्शनामध्ये स्पार्क हे दालन नवउद्योजकांना शेतीशी निगडित च्या नवीन संकल्पना मांडण्यास व्यासपीठ देईल. कृषि क्षेत्रातील १० स्टार्टअप्सना किसान प्रदर्शनात त्यांची उत्पादने आणि सेवा प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे.
मोबाईलचा वाढता वापर आणि डिजीटल इंडिया उपक्रमांमुळे शेतकर्यांशी संवाद साधणे सहज शक्य झाले आहे. यामुळेच उद्योजक नवनवीन सेवा व उत्पादने शेतकर्यांसमोर मांडण्यास उत्सुक आहेत. हे उद्योजक प्रामुख्याने बाजारभाव, जल व्यवस्थापन, शेतमालाचे मूल्यवर्धन, जैवतंत्र या क्षेत्रात नवीन संकल्पना घेऊन येत आहेत. स्पार्क दालनात शेतकरी कृषी क्षेत्रात येऊ घातलेले नवीन तंत्रज्ञान व त्यामुळे निर्माण होणार्या संधींची माहिती घेऊ शकतील.
आंतरराष्ट्रीय दालनात चीन, तैवान, इस्राएल, रशिया, आफ्रिका मधील कंपन्यांचा सहभाग आहे. मुख्यत्वे छोटी यंत्रे व अवजारे या ठिकाणी प्रदर्शित होत आहेत. भारतीय शेतकर्यांच्या गरजा व बाजारपेठ जाणून घेणे; भारतात विक्री प्रतिनिधी नेमणे, हा या कंपन्यांचा उद्देश आहे. हे दालन प्रदर्शनाचे पहिले ४ दिवस म्हणजे १३ ते १६ डिसेंबर खुले असेल.
इस्राएल टेकनॉलॉजी मीट : १४ डिसेंबरला प्रदर्शनस्थळी इस्राएल वाणिज्य दूतावास व किसान तर्फे इस्राएल मधील ८ उद्योगांची भारतातील कृषी उद्योगाशी गाठ भेट आयोजिली आहे. या इस्रायली कंपन्या त्यांचे तंत्रज्ञानाची ओळख करून देतील व त्यांच्या भारतातील प्रसारासाठी प्रतिनिधी व विक्रेते नेमण्यासाठी चर्चा करतील.
प्रदर्शन प्रवेशासाठी नावनोंदणी शुल्क रु.१००/- आहे. पूर्व नावनोंदणीची सुविधा greenpass.com या संकेतस्थळावर व kisan.net मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. या सुविधेचा वापर केल्यास प्रदर्शन स्थळी येणार्या शेतकर्यांचा वेळ वाचेल. पूर्वनोंदणी करणार्यांना प्रवेश शुल्कात ५० रुपये सवलत मिळणार आहे.
किसान संवाद स्वयंवसेवक, प्रदर्शनाच्या प्रवेशव्दारावर शेतकर्यांचा वेळ वाचवण्यासाठी, फोनद्वारे संपर्क करून त्यांचा तपशील आगाऊ गोळा करीत आहेत. आत्ता पर्यंत दहा हजार शेतक-यांनी किसानसाठी पूर्व नावनोंदणी केली आहे. ही संख्या ५० हजारांपर्यंत ओलांडण्याची अपेक्षा आहे.
मोशी येथील प्रदर्शन स्थळ हे पुणे शहरापासून सुमारे २० कि.मी. अंतरावर आहे. प्रदर्शन स्थळी जाण्यासाठी पुण्याच्या शिवाजीनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्र, लोकमंगल बस स्टॉप पासून बसची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.