पिंपरी (Pclive7.com):- मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी कायदा, पदोन्नतीमध्ये आरक्षण तसेच स्वतंत्र पाली विद्यापीठाची स्थापना आदी मागण्यांसाठी आज विधानसभेतील पायऱ्यांवर बसून आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आमदारांनी आंदोलन केले.
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या चौथ्या दिवशी विविध पक्षाच्या आमदारांनी एकत्र येऊन छेडलेल्या या आंदोलनाने मुख्यमंत्र्यासह सर्व मंत्री तसेच प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष वेधले.
पिंपरीचे आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय व महामंडळातील पदोन्नतीमधील शासन निर्णय अधिनियम २००१ नुसार अनु.जाती, अनु.जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे, तसेच आंध्र व कर्नाटक राज्याप्रमाणे महाराष्ट्रात अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी कायदा उपयोजना लागू करावी आणि स्वतंत्र पाली विद्यापीठाची स्थापना करावी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीचे नेते व आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. सुजित मिनचेकर, बालाजी किणीकर, प्रा. ज्ञानराज चौगुले, सुभाष साबणे दिलीप सोपल आदी आमदारांनी एकत्र येऊन बॅनर फडकावून आपल्या एकजूटीचे दर्शन घडविले. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना आमदार चाबुकस्वार म्हणाले की, जो लाभ अन्य राज्यातील मागासवर्गीय समुदायाला मिळतो तोच कायदा महाराष्ट्राने लागू करणे गरजेचे आहे. मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षणप्रश्नी सरकारने सकारात्मता दर्शविली असून चर्चेसाठी निमंत्रित केले असल्याचे त्यांनी सांगितले.