पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी वाघेरे गाव ते पिंपळे सौदागर मार्गातील नदीवरील नियोजित १२ मीटर समांतर पुलाचे काम लवकरच होणार अशी माहिती नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिली आहे.
या पुलामुळे शहरातून पिंपरी गाव मार्गे पिंपळे गुरव, पिंपळे सौदगर, काटे पिंपळे, पिंपळे निलख, औंध व रावेत या भागात जाणा-या येणा-या लाखों नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. या पुलासाठी नगरसेवक संदिप वाघेरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पत्रव्यवहाराने पाठपुरावा केला होता. संदीप वाघेरे यांच्या पत्राची दखल घेऊन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशाने कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, उपअभियंता विजय भोजणे, नगररचना विभागाचे कनिष्ठ अभियंता गुरव, सर्व्हेअर नाईक यांनी वाघेरे यांच्या समवेत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.
याबाबत बोलताना संदीप वाघेरे म्हणाले की, अनेक वर्षापासून या पुलाचे काम प्रलंबित होते. मी गेल्या ६ महिन्यापासून या समांतर पुला संदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. प्रशासनाने देखील या समातंर पुलाची गरज लक्षात घेऊन सकारात्मकता दर्शविली आहे. लवकरच पिंपरी वाघेरे ते पिंपळे सौदागर समांतर पुलाचे काम सुरू होईल.