पिंपरी (Pclive7.com):- गुजरात निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळेल असे अंदाज सर्वत्र वर्तविण्यात येत आहेत. मात्र भाजपाचे सहयोगी सदस्य असलेले खासदार संजय काकडे यांनी उलट अंदाज वर्तविला आहे. त्यांच्या विधानाने पक्षाची प्रतिमा मलीन झाली असून जनमत भाजपाविरोधात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे खासदार संजय काकडे यांचे निलंबन करून भाजपमधून हकालपट्टी करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
अमोल थोरात यांनी याबाबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तसेच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली आहे. थोरात यांनी म्हटलयं की, गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाला एकहाती सत्ता मिळेल असे अंदाज सर्वत्र वर्तविण्यात येत आहेत. मात्र पुण्यातील भाजपचे सहयोगी सदस्य असलेले खासदार संजय काकडे यांनी या उलट अंदाज वर्तविला आहे. गुजरातमध्ये बहुमत तर सोडा अपक्षांसह अन्य पक्षांची मदत घेऊनही सत्ता स्थापन करता येणार नाही, असे भाकित वर्तविले आहे. संजय काकडे यांच्या या भाकितामुळे भाजपची प्रतिमा मलीन झाली आहे. यापूर्वीही काकडे यांनी या प्रकारे भाकिते वर्तवून भाजपला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले आहेत. येनकेन प्रकारे प्रसिध्दीच्या झोतात राहण्याचा संजय काकडे यांचा सातत्याने प्रयत्न असतो, त्यामुळेच काकडे अशी वादग्रस्त विधाने करतात.
काकडे यांच्या या विधानामुळे भाजपची प्रतिमा डागाळत असून, जनमत भाजपविरोधात जाण्याची शक्यता आहे. भाजपचे देशभरात उत्कृष्ट काम सुरू आहे. त्यामुळे भाजपकडे मतदारांचा ओढा आहे. असे असताना संजय काकडे भाजपविरोधी भाकिते वर्तवित आहेत. त्यामुळे संजय काकडे यांचे निलंबन करून भाजपमधून त्यांची हकालपट्टी करावी अशी मगणी अमोल थोरात यांनी केली आहे.