पिंपरी (Pclive7.com):- निगडी येथील साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा शनिवारी कोणत्याही मातंग समाजाच्या नेत्याला विश्वासात न घेता हलविण्यात आला. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त आणि सत्ताधारी यांच्या संगनमताने हे कृत्य करण्यात आले असल्याच्या निषेधार्थ सोमवार दि.१८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता शहरातील बहुजन संघटना तसेच सर्वपक्षीयांच्यावतीने महापालिकेवर ‘जाब दो..’ आंदोलन करण्यात येणार आहे.
याबाबत साहित्यरत्न लोकशाहिर आण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती, आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंती महोत्सव समिती, व महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष युवराज दाखले यांनी निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटलयं की, निगडी येथील साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा शनिवार दि.१६ रोजी कोणत्याही मातंग समाजाच्या नेत्याला विश्वासात न घेता हलविण्यात आला. वास्तविक पाहता सदरचा अर्धाकृती पुतळा निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे सांस्कृतिक भवनात बसविणे अपेक्षित होते. त्याबाबत समाजातील वरीष्ठ नेत्यांनी महापालिका प्रशासनाला वेळोवेळी तशी कल्पना दिली होती.
परंतु या गोष्टीचा गांभीर्याने विचार भाजपा सत्ताधारी व महापालिका प्रशासनाने केला नाही. यांच्या निषेधार्थ बहुजन समाजाच्या विविध संघटनेच्या व सर्व राजकीय पक्षांच्यावतीने महापालिका प्रशासनाला व भाजपा सत्ताधार्यांना जाब विचारण्यासाठी ‘जाब दो’ आंदोलन सोमवारी करण्यात येणार आहे.