पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेना कार्यालयातील जप्त करण्यात आलेला संगणक मनसेने परत मिळवून दिला आहे. मनसे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले यांनी हा संगणक परत करावा यासाठी महापौरांकडे मागणी केली होती.
पिंपरी महापालिकेतील शिवसेना कार्यालयातील संगणक प्रशासनाने जप्त केला होता. गटनेते राहुल कलाटे यांच्या अनुपस्थितीत येथे संगणकाचा गैरवापर केला जात असल्याचे कारण आयुक्तांनी दिले होते. वास्तविक पाहता सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर हे या संगणकावरून सत्ताधारी भाजप विरोधात पत्रकबाजी करत होते. विरोधात होत असलेली प्रसिध्दी सहन न झाल्यामुळेच सत्ताधारी पदाधिकार्यांनी हा संगणकच जप्त करण्यास आयुक्तांना सांगितले होते.
प्रशासनाने केल्या या कारवाईची सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त होत होती. दरम्यान सेना गटनेते राहुल कलाटे यांची प्रकृती ठिक नसल्याने ते विरोध करू शकले नाहीत. मात्र शिवसेनेचे इतर नगरसेवक मुग गिळून गप्प राहिले. त्यामुळे सेनेची आक्रमकता गेली कुठे असा प्रश्न उपस्थित झाला होता. दरम्यान मनसेचे एकमेव नगरसेवक सचिन चिखले सेनेवर झालेल्या अन्यायाविरूध्द धावून आले. चिखले यांनी सत्ताधार्यांनी केलेल्या या कारवाईचा निषेध करत महापौरांना सेनेचा संगणक परत करा अशी मागणी केली.
सचिन चिखले यांनी महापौरांकडे केलेल्या या मागणीनंतर शिवसेनेचा तो जप्त करण्यात आलेला संगणक कार्यालयात परत बसविण्यात आला. एवढंच नाही तर सचिन चिखले यांच्यासाठी ही प्रशासनाने स्वतंत्र संगणक उपलब्ध करून दिला आहे. एकूणच विरोधकांची गळचेपी करण्यासाठी खेळण्यात आलेल्या या खेळीने सत्ताधारीच घायाळ झाले हे ही तितकेच खरे..!