पिंपरी (Pclive7.com):- प्राधिकरणातील शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा व पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी या मागणीसाठी पिंपरीचे आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या नेतृत्वाखाली आज नागपूर येथे आंदोलन करण्यात आले.
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात निर्णय होऊनही वेळकाढूपणा चालू असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील या दोन प्रश्नांसाठी विधानसभेतील पायऱ्यांवर उभे राहून सरकारचे लक्ष वेधून घेण्यात आले. आमदार चाबुकस्वार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सत्यजित पाटील, राजन साळवी, सुजीत मिंचेकर, सुरेश गोरे, प्रकाश आबीटकर आदी आमदारांनी यामध्ये भाग घेतला.
प्राधिकरणातील शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमिन परतावा मिळावा यासाठी आमदार चाबुकस्वार यांनी यापूर्वी तीन वेळा नगरविकास खात्याच्या राज्यमंत्र्यासमवेत बैठक घेतली होती. हा विषय अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्याकडे प्रलंबित आहे. तशीच परिस्थिती शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाच्या निर्मितीबाबत झाली आहे. निर्णय झाला परंतू अर्थखात्याची मान्यता तसेच प्रशासकीय सुस्तपणामुळे हा देखील प्रश्न लटकून राहिला आहे. मार्च मध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार चाबुकस्वार यांनी याप्रश्नी विधानसभेत लक्षवेधीही मांडली होती.
आज सकाळी या दोन प्रश्नांच्या मागणीचे बॅनर फडकावत आमदार चाबुकस्वार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सर्व आमदार विधानसभेतील पायऱ्यांवर आले. व त्यांनी आंदोलनास सुरूवात केली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार चाबुकस्वार म्हणले की, पिंपरी चिंचवड शहरातील जनतेच्या जिव्हाळयाचे हे दोन प्रश्न आहे. गेली तीन वर्षे सातत्याने आपण हे प्रश्न सोडविण्याची मागणी करत आहोत. परंतू सरकार तातडीने निर्णय घेत नाही. येत्या दोन महिन्यात हे दोन्ही प्रश्न निकाली लागले नाही तर अधिक तीव्र आंदोलन करण्यचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

























Join Our Whatsapp Group