तातडीने उपाययोजना करण्याची महावितरणकडे मागणी; तीव्र आंदोलनाचा दिला इशारा
पिंपरी (Pclive7.com):- मोहननगर, काळभोरनगर आणि आकुर्डी परिसरात गेल्या सात ते आठ दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या समस्येबाबत माजी नगरसेविका मिनल विशाल यादव यांनी महावितरणकडे निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

मिनल यादव यांनी म्हटले आहे आहे की, परिसरातील नागरिकांना सततच्या वीज खंडित होण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत तसेच अनेकदा फोनही उचलले जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.२१) महावितरणच्या संभाजीनगर येथील कार्यालयात कार्यकारी अभियंता शिर्के व कनिष्ठ अभियंता शिंदे मॅडम यांना निवेदन सादर करण्यात आले. वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

दरम्यान, या निवेदनाची दखल घेत महावितरण प्रशासनाने तातडीने पाऊल उचलले असून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत महावितरण व महापालिकेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत वीजपुरवठा खंडित होण्यामागील कारणांचा आढावा घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिनल यादव यांनी दिली आली.





















Join Our Whatsapp Group