भ्रष्ट व्यवस्था आणि प्रशासनातील दीपस्तंभ
– बाळासाहेब जवळकर –
पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘तुकाराम’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पार्श्वभूमीवर, मुंढे यांच्या संघर्षमय प्रवासाचे सिंहावलोकन करण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे.

भारतीय प्रशासकीय सेवेत कित्येक अधिकारी येतात आणि जातात. मात्र, आपली स्वतंत्र ओळख तथा अस्तित्व निर्माण करणे, प्रत्येकाला शक्य होत नाही.
सत्ता, सरकारे, धोरणे बदलत राहतात. मात्र, प्रशासकीय व्यवस्थेत अशी काही व्यक्तिमत्त्वे येतात, जी आपल्या कामांचा असा काही ठसा उमटवून जातात, की वर्षानुवर्षे त्याचा प्रभाव जनमाणसांत कायम राहतो. तुकाराम मुंढे हे त्यापैकीच एक नाव.
केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशभरातील सनदी अधिकाऱ्यांमध्ये स्वकर्तुत्वातून नावलौकिक प्राप्त केलेल्या, निवडक प्रेरणादायी अधिकाऱ्यांमध्ये तुकाराम मुंढे अग्रस्थानी आहेत.
काही माणसांच्या वाट्याला शांत रस्ते नसतात. संघर्ष हाच त्यांच्या आयुष्याचा साथीदार असतो. कष्ट, दु:ख, खडतर प्रवास, चढउतार, प्रत्येक यशानंतर नवी परीक्षा आणि प्रत्येक परीक्षेनंतर नवा संघर्ष, याच सुत्रानुसार तुकाराम मुंढे यांचे आयुष्य घडले.

२१ वर्षांमध्ये २५ बदल्या..
तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आय.ए.एस. अधिकारी आहेत. सध्या ते महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त आहेत. आतापर्यंतच्या २१ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांच्या जवळपास २५ वेळा बदल्या झाल्या आहेत. मात्र, एकही बदली स्वच्छेने किंवा कार्यकाल पूर्ण झाला म्हणून झालेली नाही.
कोणाला तरी त्यांचा प्रामाणिकपणा अडचणीचा ठरतो, नियमावर बोट ठेवून काम करण्याच्या पध्दतीमुळे ते नकोसे वाटतात, वादंग होतात, अहंभाव दुखावला जातो व त्यातून त्यांची बदली केली जाते.
चांगले काम करूनही सातत्याने त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या प्रत्येक बदलीची राज्यभर चर्चा होते. बदलीचे आदेश जाहीर होताच जनता रस्त्यावर उतरून तीव्र विरोध दर्शवते, हीच त्यांच्या कामाची खरी पावती मानली जाते.
व्यवस्था ज्याला वारंवार नाकारते. जनता त्यालाच डोक्यावर घेते. तुकाराम मुंढे हे त्याचे ठळक उदाहरण आहे.
‘नॅरेटिव्ह सेट’ करणारे कोण आहेत ?
तुकाराम मुंढे कोणत्याही दबावाला बळी पडत नाहीत, ते कोणाचेच ऐकत नाही, असा मुंढे यांच्या विरोधात ‘नॅरेटिव्ह सेट’ करण्यात येतो.
‘नॅरेटिव्ह सेट’ करणे म्हणजे काय ? तर एखाद्या व्यक्तीकडे लोकांनी कोणत्या दृष्टिकोनातून पहावे, यासाठी जाणीवपूर्वक ठराविक विचारसरणी किंवा कथा लोकांच्या मनात रुजवणे होय. मुंढे यांच्याबाबतीत हा प्रकार नेहमीच घडताना दिसतो.
हा ‘नॅरेटिव्ह सेट’ करण्यात सत्ताधारी सामील असतात तसेच नोकरशाहीतील ‘झारीतील शुक्रचार्य’ असतात, हे उघड गुपित आहे. मात्र, मुंढे नेमके काय ऐकत नाहीत, हे आजपर्यंत कोणीही उघडपणे सांगू शकले नाहीत.
याचाच असाही अर्थ काढता येऊ शकतो की, मुंढे नियमानुसार वागतात. कायद्याची भाषा बोलतात. शासकीय धोरणांची अंमलबजावणी करतात. सर्वसामान्य माणूस व त्याचे हित डोळ्यासमोर ठेवून वागतात, म्हणून त्यांना विरोध केला जातो का ?
जर नियमानुसार होणारी कामे वेळेत केली तर शासन आपलेच आहे, अशी भावना लोकांमध्ये निर्माण होऊ शकते, असे मुंढे यांचे मत असूच शकते. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्नशील असणे, यात गैर काहीच नाही.

नियुक्तीपासूनच बदल्यांचा अनुभव..
तुकाराम मुंढे यांची प्रशिक्षणार्थी म्हणून पहिली नियुक्ती सोलापूर जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी या पदावर झाली. त्यानंतर, बार्शी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि माढा येथे गटविकास अधिकारी (बीडीओ) म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंढे यांची पहिली नियुक्ती मिरज (सांगली) येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून झाली. मात्र, त्यांना तेथे रूजू करून घेण्यात आले नाही. त्याऐवजी, अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या धारणीत प्रकल्प अधिकारी म्हणून ऐनवेळी पाठवण्यात आले. तिथेही तसाच प्रकार झाला.
धारणीत जाण्यासाठी ‘ऑन द वे’ असताना ती नियुक्ती रद्द करण्यात आल्याचा निरोप मुंढे यांना देण्यात आला. त्यामुळे त्यांना माघारी परतावे लागले. बराच काळ प्रतिक्षेत राहिल्यानंतर ‘देगलूर’च्या सहायक जिल्हाधिकारी पदावर त्यांची पहिली नियुक्ती करण्यात आली.
प्रशासकीय सेवेतील पहिल्या नियुक्तीच्या ठिकाणी रूजू होण्यापूर्वीच अशाप्रकारे बदल्यांचा अनुभव घेणारे तुकाराम मुंढे हे देशातील दुर्मिळातले दुर्मिळ उदाहरण असले पाहिजे.
‘महाराष्ट्र भ्रमण’..!
नंतरच्या प्रवासात, प्रशासकीय बदल्या, हा तुकाराम मुंढे यांच्या आयुष्यातील अविभाज्य घटकच बनला. त्यांच्या वारंवार बदल्या होत राहिल्या. त्यातून त्यांचे ‘महाराष्ट्र भ्रमण’ घडले.
एकाही नियुक्तीच्या ठिकाणी त्यांना कालावधी पूर्ण करता आला नाही. प्रत्येक ठिकाणी काम करताना नियम, कायदे पाळण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले. आर्थिक शिस्त लावताना कठोर निर्णय घेतले. प्रामाणिकपणाची कास कधीही सोडली नाही. राजकीय तथा अन्य कोणत्याही दबावाला, आमिषाला ते बळी पडले नाहीत. कोणत्याही दबावतंत्राला त्यांनी भीक घातली नाही.
सत्याचा आग्रह धरताना परिणामांचा विचार केला नाही. त्यांच्या एकूण प्रवासात संघर्ष हा त्यांच्या पाचवीला पुजलेला आहे, हे स्पष्टपणे दिसून येते.
आक्षेप, मतभेद असू शकतात. पण…
तुकाराम मुंढे हे परिपूर्ण आहेत, असा दावा कोणीही करणार नाही. त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप असू शकतात, निर्णय घेण्याच्या शैलीबाबत मतभेद असू शकतात, स्वभावातही दोष असू शकतात. तरीही त्यांचा प्रामाणिकपणा, स्वच्छ प्रतिमा, कार्यक्षमता, तत्त्वनिष्ठा यावर कदापि शंका घेता येणार नाही. राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधींच्या नियमबाह्य कामांची, अपेक्षांची ते पूर्तता करत नाहीत, हेच अनेकदा संघर्षाला आमंत्रण ठरते. त्यातून मानापमान आणि बदलीनाट्य रंगते.
नागरिकांमध्ये दृढ विश्वास..
तुकाराम मुंढे यांच्या प्रत्येक बदलीने प्रशासनातील अस्वस्थता अधोरेखित झाली. एखाद्या अधिकाऱ्याच्या किती वेळा बदल्या व्हाव्यात, याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या. तरीही खचून न जाता, नाउमेद न होता प्रत्येक बदलीनंतर मुंढेंनी त्याच तडफेने काम केले. अशा कामगिरीमुळेच सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याविषयीचा विश्वास दृढ होत गेला.
समाजाच्या पाठबळाची गरज..
आजच्या काळात पारदर्शक कारभाराची, अचूक निर्णयक्षमतेची नितांत गरज आहे. त्यामुळेच तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी समाजात आशेचा किरण निर्माण करतात.
तत्वांशी, मूल्यांशी कधीही तडजोड न करणाऱ्या मुंढे यांची कारकीर्द म्हणजे गढूळ झालेली व्यवस्था सुधारण्याच्या ध्यासाची प्रेरणादायी गाथा आहे.
प्रामाणिकपणा, पारदर्शकता, निर्भयता या गुणांचे खरोखरच कौतुक करायचे असेल, तर समाजाने तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी आणखी ठामपणे उभे राहिले पाहिजे.
गरिबांचे अश्रू पुसण्याचे साधन..
‘तुकाराम’ या पुस्तकाच्या निमित्ताने तुकाराम मुंढे यांचे थोरले बंधू अशोकराव मुंढे सांगतात की,
जन्मापासून ते सनदी अधिकारी होण्यापर्यंत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत तुकारामने यश मिळवले आहे. मनात जिद्द असेल आणि ध्येय स्पष्ट असेल तर यशापर्यंत नक्कीच पोहचता येते.
जन्माला आलेल्या प्रत्येकाची एक कथा असतेच. संपूर्ण समाजासाठी दीपस्तंभ ठरू शकेल, अशी तुकारामची कथा आहे. यश कधीही चांदीच्या ताटात सजवून मिळत नाही, त्यासाठी अपार कष्ट उपसावे लागतात.
सुखाची स्वप्ने पाहायची असतात, त्या वयात तुकाराम जबाबदारीचे ओझे खांद्यावर घेऊन चालत राहिला. फाटकी पुस्तके, तुटलेली चप्पल, रात्रीच्या वेळी कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास, असे सारे संघर्षाचे क्षण त्याच्या वाट्याला आले. प्रतिकूल परिस्थितीतही तो अविचल चालत राहिला. पोटातील भुकेपेक्षा त्याच्या स्वप्नांची भूक मोठी होती. त्याने शिक्षणाकडे स्वतःचे आणि समाजाचे नशीब बदलण्याचे शस्त्र म्हणून पाहिले. प्रशासकीय सेवेतील पद केवळ अधिकार गाजवण्याचे स्थान नाही, तर ते गरिबांचे अश्रू पुसण्याचे साधन आहे, हे तुकाराम जाणतो.
नियतीला आव्हान देण्याचे धाडस..
तुकाराम मुंढे यांच्यावर आधारित ‘तुकाराम’ हे पुस्तक मूळ नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार शफी पठाण यांनी लिहिले आहे. ‘लोकसत्ता’सह विविध वर्तमानपत्रांत त्यांनी २५ हून अधिक वर्षे काम केले आहे.
प्रकाशनापूर्वीच या पुस्तकाच्या एक लाखांपेक्षा अधिक प्रतींची आगावू नोंदणी झाली होती. १७ जुलै २०२६ रोजी पुण्यात पुस्तकाचे प्रकाशन झाले, तेव्हा विक्रमी गर्दी उसळली होती. एखाद्या पुस्तक प्रकाशनाच्या समारंभासाठी इतका मोठा जनसमुदाय जमू शकतो, हेच मुळात आश्चर्य होते.
‘कुछ जिन्दगिया चाहती हैं
मुकम्मल इंकलाब’
‘चंद छोटी लडाईयों से
जंग पूरी नही होती…!
तुकाराम मुंढे यांचा जीवनप्रवास या ओळींशी एकरूप असाच आहे. कुठल्याही सामान्य माणसाचे जगणे, हे कायमच नियतीच्या परिघाभोवती फिरत राहते. काही अपवादात्मक माणसे अशी असतात, जी थेट नियतीला आव्हान देण्याचे अचाट धाडस करू शकतात. त्यांना ‘चंद छोटी लडाईया’ मान्यच नसतात. ते मुळात जन्मलेच ‘मुकम्मल इंकलाब’साठी असतात. तुकाराम मुंढे हे त्यातलेच एक आहेत.
– शफी पठाण
‘तुकाराम’ पुस्तकाचे लेखक
(दिनांक २१ जुलै २०२६)





















Join Our Whatsapp Group