पिंपरी (Pclive7.com):- निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू असल्याने मुंबई-पुणे महामार्गावरील निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपुलाखाली वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पीएमपीएमएल, पिंपरी-चिंचवड महापालिका, मेट्रो प्रशासन आणि वाहतूक पोलिसांकडे तक्रार दाखल करत निगडी बसस्टॉपचे तात्पुरते स्थलांतर भक्ती-शक्ती उद्यानासमोर करण्याची मागणी केली आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी महामार्गाच्या कडेला लोखंडी पत्रे उभारण्यात आल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. त्यातच निगडी बसस्टॉपवर पीएमपीएमएल बस, खासगी ट्रॅव्हल्स आणि इतर मोठ्या वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे काळभोर यांनी निवेदनात नमूद केले आहे.

या परिसरातून दररोज हजारो नागरिक, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच दुचाकी व चारचाकी वाहनचालक प्रवास करतात. रस्ता अरुंद झाल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडून पडत असून अपघाताची शक्यताही वाढली असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, मेट्रो प्रकल्प अधिकारी श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि वाहतूक पोलिस उपायुक्त देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून निगडी बसस्टॉप भक्ती-शक्ती उद्यानासमोर स्थलांतरित करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे. दरम्यान नागरिकांना विनाकारण त्रास होऊ नये तसेच भविष्यातील अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.





















Join Our Whatsapp Group