पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी येथील सिटी मॉल मध्ये झालेल्या वादातून भोसरीत एकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहाच्या पाठीमागे आज ही घटना घडली. पंकज फुगे हा या गोळीबारात जखमी झाला असून अजिंक्य माने याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार गेल्या काही दिवसांपूर्वी भोसरी येथील दोन गटात किरकोळ वाद झाला होता. पिंपरीतील सिटी मॉलमध्ये हा वाद झाला होता. तोच राग डोक्यात ठेऊन आज दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहाच्या मागे पंकज फुगे जात असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. यात तो जखमी झाला असून पाठीवर गोळी चाटून गेली आहे. गोळीबार करणारा अजिंक्य माने याला ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक आयुक्त सतीश पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली असून याप्रकरणी भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.