पिंपरी (Pclive7.com):- भोसरीत आज दुपारी झालेल्या गोळीबार प्रकरणाने वेगळीच कलाटणी घेतली आहे. पूर्ववैमनस्यातून अजिंक्य माने या तरूणावर गोळीबार करण्यासाठी आलेल्या टोळक्यातील पंकज फुगे हाच त्याचा साथीदार बंटी टकले याच्याकडून झालेल्या गोळीबारात जखमी झाला. परंतू अजिंक्य माने याने गोळीबार केल्याचा बनाव पंकज याने सुरूवातीला केला होता. तपासात अजिंक्य नव्हे तर पंकजच गोळीबार करण्यासाठी आल्याचे उघड झाले. या प्रकरणी २ जणांना अटक करण्यात आली आहे.
आज दुपारी भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहामागे गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळाबारात पंकज फुगे हा जखमी झाला होता. त्यानंतर जखमी पंकजने त्याच्यावर अजिंक्य माने यानेच गोळीबार केल्याचे पोलीसांना सांगितले. त्यानुसार पोलीसांनी अजिंक्य माने याला ताब्यात घेतले. पोलीसांनी त्यानंतर तपास सुरू केल्यावर उलटाच प्रकार समोर आला.
पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार अजिंक्य आणि पंकज यांच्यात वाद झाला होता. तो वाद मिटवण्यासाठी पंकज फुगे पाच जणांसह अजिंक्य माने याला भेटायला आला होता. मात्र त्यावेळी त्याच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी पंकज सोबत आलेल्या बंटी टकले याने पिस्तुल बाहेर काढले. ते पाहून अजिंक्य तेथून पळाला, त्याच्या मागे पंकज पळाला. दरम्यान बंटी टकले याने अजिंक्यच्या दिशेने गोळीबार केला. मात्र ती गोळी पंकजच्याच पाठीला लागली. त्यानंतर पंकजसह आलेले सर्व साथीदार घटनास्थळावरून फरार झाले. तर पंकज याला काहींनी उपचारासाठी भोसरीतील एका खाजगी रूग्णालयात दाखल केले. त अजिंक्य यानेच आपल्यावर गोळीबार केल्याचा पंकज याने बनाव केला. सुरूवातीला अजिंक्य याने गोळीबार केल्याचे जखमी पंकज याने सांगितले होते. त्यामुळे अजिंक्य यालाच ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर खरा प्रकार उघड झाला.
दरम्यान अप्पर पोलिस आयुक्त रविंद्र सेनगावकर यांनी घटनास्थळी पाहणी करून, तपासाच्या सूचना दिल्या. सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश पाटील, संजय निकम (गुन्हेशाखा), वरिष्ठ निरीक्षक संपराव भोसले, आर. एम. तोडकर, ब्रम्हानंद नायकवडी आदींनी दोघांना अटक करून, पथक रवाना केली.