पिंपरी (Pclive7.com):- दिवाळी निमित्त प्रतिवर्षीप्रमाणे शुक्रवार दि.१० नोव्हेंबर आणि शनिवार दि.११ नोव्हेंबर रोजी नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन यांच्या सौजन्याने “स्वरांजली दीपावली पहाट” या सुमधुर संगीत कार्यक्रमाचे आयोजन पिंपळे सौदागर मध्ये करण्यात आले होते.
“स्वरांजली दीपावली पहाट” या कार्यक्रमात सावनी रविंद्र, चैतन्य देवढे, अंशिका चोणकर आणि हिम्मत कुमार पंड्या या दिग्गज गायक गायिकांच्या एका पेक्षा एक सरस मधुर मराठी अजरामर गाण्यांची मेजवानी पिंपळे सौदागर, रहाटणीवासियांना लाभली. तसेच या गायकांच्या संगीत संयोजनामध्ये अनिल धोत्रे (गिटार), नितीन खंडागळे आणि समत पठाण (कीबोर्ड), सोहम सोनवणे आणि अनिल बोर्डे (ड्रम सेट), श्रीधर मोरे (ड्रम मशीन), सारंग भांडवलकर (तबला पकवाच), पप्पू बँडलोक (ढोलक ढोलकी) या प्रिय वादकांनी रंगतदार साथ दिली.
यावेळी “समृद्धी झोडगे” या लहान मुलीने “चंद्रा” गाण्यावर भन्नाट नृत्य सादर करून उपस्थितांचे मन जिंकत सर्वांचे लक्ष वेधले. तर जेष्ठ नागरिकांनी देखील विविध गाण्यांवर ठेका धरत मनसोक्तपणे या संगीत कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. या गायक गायिकांनी मराठी चित्रपट संगीत, सुमग संगीत, भावसंगीत, नाट्य संगीत, लोकगीते, कोळीगीते, लावणी ते अगदी शास्त्रीय संगीत तसेच सदाबहार हिंदी गीत सादर करीत उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध करीत थिरकवले. दिवाळी पहाटचे स्वागत सुरांच्या मैफलीने साजरे करण्याची पद्धत गेल्या २५ ते ३० वर्षांपासून रूढ झाली आहे. दिग्गज गायकांसह नवोदित गायकांचा सहभाग हे या मैफलींचे वैशिष्ट्य म्हणता येईल. “स्वरांजली दीपावली पहाट” या कार्यक्रमाच्या माध्यमातून एखाद्या मान्यवर गायकाला प्रत्यक्ष ऐकणे आणि त्याच्या सुरांची जादू अनुभविणे यात एक वेगळाच आनंदाचा अनुभव पिंपळे सौदागर परिसरातील रसिकांना आला.
या दोन दिवसीय “स्वरांजली दीपावली पहाट” या सुरमयी संगीत कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद देऊन यशस्वी केल्याबद्दल नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. अनिल गोंदकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.