वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती; आयटीयन्स तसेच सर्व सामान्य वाहनचालकांकडून उपक्रमांचे कौतुक
पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मावळ लोकसभा संघटक आणि पिंपरी-चिंचवड शहराचे माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील यांनी ‘सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ जपत विधायक उपक्रम हाती घेतला आहे. आयटी पार्क हिंजवडी आणि परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्वयंप्रेरणेतून स्वयंसेवक (ट्राफीक वॉर्डन)ची नेमणूक करण्यात आली आहे. या उपक्रमांचे आयटीयन्स आणि सर्वसामान्य वाहनचालकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
हिंजवडी आयटी पार्क आणि परिसरात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. आयटी पार्क परिसरातील शिवाजी चौक आणि भूमकर चौक परिसरात सकाळी आणि संध्याकाळी मोठी वाहतूक कोंडी होते. वाकड चौकातून शिवाजी चौकाकडे जाणारा रस्ता आणि प्रमुख चौकांत वाहनचालकांना कसरत करावी लागते. वाहनांच्या रांगा लागत असल्यामुळे वाहतूक समस्या गंभीर झाली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये वाहतूक समस्यांमुळे काही आयटी कंपन्यांचे स्थलांतर झाले आहे. पर्यावरण, रोजगार आणि नागरी आरोग्याचा विचार करता वाहतूक सक्षम करणे काळाची गरज आहे. या सोबतच सामाजिक दायित्वाच्या भावनेतून नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षीत आहे.
आयटी पार्क हिंजवडी येथे जाणाऱ्या लोकांना रोज ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. त्यामुळे संजोग वाघेरे यांनी ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी पिंपळे सौदागर, डांगे चौक, भुमकर चौक अशा ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त केले आहेत. त्याचा फायदा वाहतूक पोलीस आणि वाहनचालकांनाही होत आहे.
सुरक्षित वाहतुकीची जनजागृती…
माजी महापौर संजोग वाघेरे यांनी नियुक्त केलेल्या ट्रॉफिक वॉर्डन यांच्याकडून सुरक्षित वाहतूक आणि प्रवासासाठी जनजागृती केली जात आहे. वाहतूक नियमांचे पालन करा, हेल्मेट वापरा, लेनच्या शिस्तीचे पालन करा… असे आवाहन करणारे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी होणारा हा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे, अशा भावना नागरिकांच्या आहेत.
पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि उपलब्ध पायाभूत सोयी-सुविधा यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. दुचाकी आणि चारचाकी अशा वाहनांचा विचार केला तर ही संख्या १६ लाखांच्या घरात आहे. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते. वाहतूक कोंडी, पर्यावरण व ध्वनी प्रदूषण याबाबत वारंवार चर्चा होते. त्यामुळे स्वत: पुढाकार घ्यावा, या भावनेतून हा उपक्रम आम्ही सुरू केला आहे.– संजोग वाघेरे, संघटक, मावळ लोकसभा, शिवसेना (उबाठा).