पिंपरी (Pclive7.com):- निगडी पोलिसात तक्रार केल्याच्या कारणावरून महापालिकेच्या कंत्राटदाराला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि.१८) सकाळी सव्वा आठ वाजता ओटास्कीम निगडी येथे घडली.
नफीस सलीम शेख (वय ४२, रा. ओटास्कीम, निगडी) असे मारहाण झालेल्या कंत्राटदाराचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अरबाज शेख, मुन्ना उर्फ फैयाज शेख, कलवा उर्फ सरफराज शेख, रियाज शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी रविवारी सकाळी फिर्यादी शेख यांच्या घरासमोर आले. त्यांनी मोठमोठ्याने शिवीगाळ केली. त्यामुळे शेख यांनी घराबाहेर येऊन शिवीगाळ कोणाला करता, असे विचारले. त्यावरून आरोपींनी ‘तुम्ही आमच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात तक्रार का केली’ असे म्हणून शेख यांच्याशी वाद घातला. त्यांना शिवीगाळ करून दगड, लोखंडी कटर, काठी आणि हाताने बेदम मारहाण केली. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.