पुढील टप्प्यात निगडी ते वाकड व वाकड ते चाकण मेट्रो मार्गांचा प्रस्ताव; मेट्रो सेवेवर प्रवासी खूश, काही सुधारणा करण्याचीही सूचना
पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (बुधवारी) सकाळी महा मेट्रोने प्रवास करीत प्रवाशांशी संवाद साधला. पिंपरी ते भक्ती- शक्ती या टप्प्यानंतर निगडी- किवळे- रावेत- वाकड तसेच वाकड- नाशिक फाटा- भोसरी- चाकण या दोन नवीन मेट्रो मार्गाचा प्रस्ताव असल्याचे बारणे यांनी यावेळी प्रवाशांना सांगितले.
खासदार बारणे यांनी आज सकाळी पिंपरी ते दापोडी दरम्यान महामेट्रोने प्रवास केला. त्यांच्या समवेत शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर पिंपरी चिंचवड शहर प्रमुख निलेश तरस युवा सेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे तसेच अनेक पदाधिकारी होते.
खासदार बारणे यांनी पाठपुरावा करून पिंपरी ते भक्ती-शक्ती या मेट्रो मार्गाला परवानगी मिळविल्याबद्दल प्रवाशांनी त्यांना धन्यवाद दिले. पुढील टप्प्यामध्ये निगडी- किवळे- रावेत- वाकड या मेट्रो मार्गाचा प्रस्ताव आहे. हा मार्ग शिवाजीनगर- हिंजवडी या मार्गाला जोडला जाईल. या खेरीज वाकड- नाशिक फाटा- भोसरी- चाकण हा मेट्रो मार्ग देखील प्रस्तावित आहे. त्यामुळे शहरातील मेट्रो सेवेचे जाळे बऱ्यापैकी विस्तारले जाणार आहे, अशी माहिती बारणे यांनी यावेळी दिली.
मेट्रोमुळे प्रवास सुखकारक, आनंददायक होत असून वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होत असल्याचे प्रवाशांनी यावेळी आवर्जून सांगितले. मेट्रो स्थानाकांजवळ प्रशस्त वाहनतळची सोय व्हावी, अशी अपेक्षा काही प्रवाशांनी व्यक्त केली.
खासदार बारणे यांना मेट्रो स्थानकावर पाहून प्रवाशांना सुखद धक्का बसला. अनेक प्रवाशांनी पुढे येऊन खासदार बारणे यांची भेट घेतली व त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. अनेक प्रवाशांनी मेट्रोच्या कोचमध्ये बारणे यांच्या समवेत सेल्फी देखील घेतले.
Tags: खासदार श्रीरंग बारणेदापोडी ते पिंपरी मेट्रो प्रवासपिंपरी चिंचवडमावळ लोकसभामेट्रो प्रवासशिवसेना