पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड कल्चरल फाउंडेशन २०२४ चा कलाविभूषण हा पुरस्कार यंदा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष विजयराव भिसे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच पिंपरी येथे पार पडली. यावेळी मृणाल कुलकर्णी यांना यंदाचा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष विजय भिसे यांनी दिली.
१ मे रोजी ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून एकवीस हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दरम्यान यंदाचे पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. यापूर्वी २०२२ चा प्रथम पुरस्कार राष्ट्रीय अवॉर्ड विजेती गायिका सावनी रवींद्र यांना देण्यात आला. तर मागील वर्षी हा पुरस्कार निर्माते दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आला होता.
मृणाल कुलकर्णी यांच्या रुपेरी पडद्यावरील भूमिका नेहमीच उत्तुंग अशा सामाजिक आणि ऐतिहासिक स्वरूपाच्या ठरल्या आहेत. त्या केवळ अभिनेत्रीच नसून संवेदनशील लेखिका असल्याचे विजय भिसे यांनी आवर्जून सांगितले. याप्रसंगी मृणाल कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत देखील यावेळी घेण्यात येणार आहे.