पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ काळेवाडी येथे आयोजित बैठकीत आज (दि.०८) आरपीआय आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांचे नाराजीनाट्य पाहायला मिळाले. आरपीआय आठवले गटाचे शहराध्यक्ष स्वप्नील कांबळे यांना व्यासपीठावर न बोलवल्याने आणि त्यांचा नामोउल्लेख न केल्याने आरपीआय आठवले गटाच्या काही कार्यकर्त्यांनी बैठकीतून काढता पाय घेत नाराजी व्यक्त केली.
जोपर्यंत रामदास आठवले यांचा आदेश येत नाही. तोपर्यंत आम्ही श्रीरंग बारणे यांचा प्रचार करणार नाहीत, अशी भूमिका आरपीआय गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. मात्र मंती उदय सामंत आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी सप्नील कांबळे यांची समजूत काढली. सूत्रसंचालकांकडून चूक झाल्याचे सांगत नाराजी दूर केली, आणि व्यासपीठावर त्यांना स्थानापन्न केले.
पिंपरी- चिंचवडमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी आज एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, उदय सामंत यांच्यासह महायुतीतील सर्व शहराध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. दरम्यान, या बैठकीदरम्यान नाराजी नाट्य बघायला मिळालं. आरपीआय गटाचे शहराध्यक्ष स्वप्नील कांबळे यांचा नामोल्लेख आणि व्यासपीठावर बसण्यास न बोलावल्याने त्यांच्यासह काही पदाधिकारी यांनी या बैठकीतून काढता पाय घेत नाराजी व्यक्त केली. शेजारून जाणाऱ्या सामंत यांनी या आरपीआय आठवले गटाच्या नाराजीची कुणकुण लागल्याने त्यांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. सामंत यांनी मध्यस्थी करत उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याशी शहराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची भेट घडवून या नाराजी नाट्यावर पडदा टाकला.