पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मधील माजी विद्यार्थ्यांचे यश हे सर्व प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरणारे आहे. या माजी विद्यार्थ्यांची प्रगती पाहून प्राध्यापकांना आणखी चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते असे एसबीपीआयएम च्या संचालक डॉ. कीर्ती धारवाडकर यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये बारावा माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मेळाव्यास डॉ. कीर्ती धारवाडकर, डॉ. रूपाली कुदरे, हेमंत राजेशथ, आकाश राऊत, डॉ. अनिषकुमार कारिया, डॉ.स्वप्नील सोनकांबळे, डॉ. भूषण परदेशी, एमबीए प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी उपस्थित होते.
माजी विद्यार्थ्यांनी “एसबीपीआयएम पिनॅकल” या न्यूजलेटरच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यामध्ये माजी विद्यार्थ्यांची यशोगाथा, प्रगती आणि मार्गदर्शन इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, त्यांना प्रेरणा देणे हे अंकाच्या सहाय्याने करण्यात येणार आहे. इतर विद्यार्थ्यांना त्याची मदत होईल असे एसबीपीएमच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर यांनी सांगितले.
उद्योजक हर्षल बोरसे व प्रीती प्रभाकरण या माजी विद्यार्थिनीने जिद्द आणि चिकाटीने स्पर्धा परीक्षा आणि करिअरमध्ये कसे यशस्वी होता येईल याविषयी मार्गदर्शन केले. माजी विद्यार्थी पियुष चावडा, तुषार चिंचोले, आदित्य चिकणे, अजय बैरागी, प्रतीक नाईक, मयूर निलंगेकर या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगितले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी माजी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संयोजन डॉ. स्वप्निल सोनकांबळे, डॉ. काजल माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थी संघटना यांनी केले. सूत्रसंचालन सुरज पाटील आणि तृप्ती गुप्ता यांनी केले. डॉ. अनिषकुमार कारिया यांनी आभार मानले.