पिंपरी (Pclive7.com):- नोकरी लावण्याच्या आमिषाने एकाची २१ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी खासगी कंपनीसह दोघांविरुद्ध शुक्रवारी (दि.१५) गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अमोल भास्कर गर्जे (३५, रा. पूजा विहार, फ्लॅट नंबर ९, सेक्टर ६, मोशी – प्राधिकरण) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन छब्बान सूर्यवंशी, मिलिंद पाध्ये आणि एजी इन्व्हायरो कंपनी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सप्टेंबर २०२३ ते २८ जून २०२४ दरम्यान घडली. पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यालय आणि पिंपरीतील रत्ना हॉटेल येथे फिर्यादीची आरोपींसमवेत झालेल्या भेटीनंतर ही फसवणूक झाली आहे.
आरोपींनी फिर्यादीला एजी इन्व्हायरो कंपनीमध्ये नोकरीला लावतो, असे आमिष दाखविले. मात्र त्यांना कोणत्याही प्रकारे नोकरी न देता एकूण २१ लाख २० रुपये ऑनलाईन तसेच रोख स्वरूपात घेतले. तसेच, ही रक्कम फिर्यादीला परत न करता त्यांच्या पैशांचा अपहार केला. त्याचप्रमाणे, अश्विनी गायसमुद्रे व विशाल खांदवे यांच्या देखील पैशाचा अशाच प्रकारे अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.






















Join Our Whatsapp Group