देहू (Pclive7.com):- श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त रविवारी (दि.१६) देहूनगरीत लाखो वारकरी भाविक दाखल झाले आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दिंड्या, हरिनामाचा गजर, हरिपाठ, भजन, कीर्तन आणि टाळ-मृदंगाच्या गजराने देहूनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. बीज सोहळ्यानिमित्त देहूतील मुख्य मंदिरावर विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे.
रविवारी (दि. १६) बीज सोहळादिनी श्री संत तुकाराम महाराज मुख्य मंदिरात पहाटे ३ वाजता काकड आरती, पहाटे ४ वाजता देवस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त मंडळ यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज महापूजा व श्रींची महापूजा करण्यात आली आहे. सकाळी सहा वाजता वैकुंठगमन स्थान येथे पूजा संपन्न झाली आहे. सकाळी साडेदहाला श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे वैकुंठस्थान मंदिराकडे प्रस्थान होणार आहे. त्यानंतर महाराजांच्या पादुका फुलांनी सजवलेल्या पालखीतून वैकुंठ गमन मंदिराकडे हरिनामाच्या गजरात मार्गस्थ होतील.
वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त सकाळी दहा वाजता हभप देहकरमहाराज मोरे यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर दुपारी बारा वाजता हरिनामाच्या गजरात वारकरी, भाविकभक्त नांदुरकीच्या वृक्षावर तुळशी आणि पुष्यांचा वर्षाव करून हा बीजसोहळा अनुभवतील, त्यानंतर श्री संत तुकाराम महाराजांची पालखी दुपारी २ वाजता मुख्य मंदिरात येऊन दाखल होईल. त्या ठिकाणी देहू देवस्थानच्या वतीने वारकरी, दिंडीकरी, विणेकरी यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त असून, वैकुंठगमन मंदिराच्या परिसरात संस्थानच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता. तेथे बंदिस्त मंडप होता. तो चोहोबाजूने मोकळा करण्यात आला असून, स्टेजही काढण्यात आले आहे. तेथे यंदा प्रथमच मंडप घालण्यात आला आहे. याच मंडपातून पालखी मुख्य मंदिरातून वैकुंठगमन मंदिरात जाणार आहे. मंडपाच्या सावलीत क्षमतेपेक्षा जास्त भाविक जमा होण्याची शक्यता आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने मुख्य मंदिर व वैकुंठगमन मंदिराला, तर गाथामंदिर संस्थानच्या वतीने गाथा मंदिराला विद्युत रोषणाई केली आहे. नदीपात्र रंगांमध्ये न्हाऊन निघाल्यासारखे भासत आहे.






















Join Our Whatsapp Group