देहू (Pclive7.com):- हा पुरस्कार माझा एकट्याचा नाहीये. माझ्यावर प्रेम करणाऱ्या कामावर प्रेम करणाऱ्या वारकऱ्यांचा, धारकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, माझ्या लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा, ज्येष्ठांचा, सगळ्यांचा आहे. आणि म्हणून माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. या समाजाची सेवा अधिक जोमाने करण्याची प्रेरणा मला यातून मिळाली आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
देहू येथे संत तुकाराम महाराज बीज सोहळा आज संपन्न होत आहे. संत तुकाराम महाराज संस्थानकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह सर्व प्रमुख विश्वस्त पदाधिकारी उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांची बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, या वारकरी संप्रदायाबद्दल मनात आदर आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुरस्कार माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला देहू संस्थानने मला त्यासाठी त्यांनी योग्य समजलं हे माझ्यासाठी फार भाग्याचं आहे. आणि म्हणून हा पुरस्कार दिल्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. त्याचबरोबर हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाहीये, माझ्यावर प्रेम करणाऱ्या तसेच माझ्या कामावर प्रेम करणाऱ्या वारकऱ्यांचा, धारकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, माझ्या लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा, ज्येष्ठांचा, सगळ्यांचा आहे. आता मला हा पुरस्कार मिळालाय आता आणखी माझी जबाबदारी वाढली आहे. या समाजाची सेवा अधिक जोमाने मला करण्याची प्रेरणा यातून मिळालेली आहे. वारकऱ्यांची देखील सेवा करण्याची संधी मला या पुरस्कारामुळे मिळाली आहे, म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. इथे छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भेट झालेली. अशा पवित्र भूमीमध्ये हा पुरस्कार मला मिळतोय याच्यापेक्षा दुसरं भाग्य नाही असं शेवटी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले.