पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट ग्रामीण भागातील विकास कामांच्या माध्यमातून अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तळवडे ते च-होली मोशी पर्यंतच्या नागरिकांचा पिण्याचा प्रश्न आंद्रा व भामा आसखेडच्या प्रकल्पामुळे येत्या काळात सुटणार असल्याचे, आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक. दोन जाधववाडी व मोशी मधील विविध रस्त्यांचे व विकास प्रकल्पांचे भूमीपूजन आज (गुरुवारी) त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला स्थायी समिती सभापती सीमा सावळे, ‘क’ प्रभाग अध्यक्षा अश्विनी जाधव, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती लक्ष्मण सस्ते, शहरसुधारण समिती सभापती सागर गवळी, नगरसदस्य राहुल जाधव, वसंत बोराटे, राजेंद्र लांडगे, नगरसदस्या सारीका बो-हाडे, माजी नगरसदस्य शरद बो-हाडे, बबन बोराटे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, संजय भोसले, उपअभियंता विजय वाईकर, जे.डी.जाधव आदि उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांपर्यत विकास कामांच्या माध्यमातून विकासगंगा पोहचविण्याचा प्रयत्न आहे. गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यांसह नागरी सुविधांची प्रलंबित असलेली कामे मार्गी लावण्यास यश आल्याचे समाधान आहे. आगामी काळात समाविष्ट गावांचा कायापालाट केला जाणार आहे.
समाविष्ट भागातील नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु आहेत. आंद्रा व भामा आसखेडच्या प्रकल्पामुळे या भागातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन देण्यात येईल. लवकरच पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील मार्गी लावणार आहे.
यावेळी ‘क’ प्रभाग अध्यक्षा अश्विनी जाधव, नगरसदस्य राहुल जाधव, वसंत बोराटे, नगरसदस्या सारीका बो-हाडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी बो-हाडेवाडी बनकरवस्ती मधील सुमारे नऊ कोटी ३२ लाख रूपये खर्चाच्या डी.पी. रस्त्यांच्या कामांचा प्रारंभ करण्यात आला. देहू-आळंदी मुख्य रस्त्या लगतच्या परिसरातील सुमारे नऊ कोटी ३२ लाख रूपये खर्चाच्या रस्त्यांचे भूमीपूजन करण्यात आले. मोशी येथील स्मशान घाट व परिसर विकासांच्या कामांचे भूमीपूजन यावेळी करण्यात आले. मोशी जाधववाडी शीवेवरील विकास आराखड्यातील २४ मीटर रूंदीच्या व सुमारे २४ कोटी रूपये खर्चाच्या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. वडाचामळा परिसरातील विकास आराखड्यातील सुमारे नऊ कोटी ३३ लाख रूपये खर्चाच्या रस्त्यांचे भूमीपूजनही यावेळी करण्यात आले. पुणे-नाशिक रस्ता ते बारणे वस्ती या विकास आराखड्यातील २४ मीटर रूंदीच्या व सुमारे २२ कोटी रूपये खर्चाच्या रस्त्यांचे भूमीपूजनही यावेळी करण्यात आले.