पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. शहरात सकाळपासून शांततापूर्ण वातावरणात मतदान सुरु आहे. दरम्यान महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील तीनवेळा समोरासमोर आले. पण, त्यांनी एकमेकांकडे पाहिले देखील नाही.
मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजाविला. त्यानंतर दोघेही मतदारसंघातील मतदान केंद्रावर जाऊन भेटी देत आहेत. मतदानाचा आढावा घेत आहेत.
पिंपळेसौदागर येथील मतदान केंद्रावर श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे पाटील हे दोघे समोरा समोर आले. पण, त्यांनी एकमेकांना ओळखही दाखविली नाही. त्यानंतर शितोळेनगर आणि सांगवीत देखील दोघे समोरा-समोर आले. तीनवेळा दोघे समोरासमोर येऊन पण, एकमेकांना ओळखही दाखविली नाही. त्यामुळे प्रचारा दरम्यान एकमेकांवर केलेल्या आरोपांमुळे या दोन्ही उमेदवारांमधील कटूपणा अद्यापही कायम असल्याचे दिसून येत आहे.