पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमधील शाळांचे फायर सेफ्टी नूतनीकरण फी वाढवू नये म्हणून शाळांच्या वतीने अमित गोरखे यांनी महापालिका आयुक्तांकडे मागणी केली आहे.
महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या खाजगी शाळांना फायर सेफ्टी नूतनीकरण फी वाढवण्यात आली आहे. यामुळे शाळांना आर्थिक भार सहन करावा लागत आहे. याविरोधात अमित गोरखे यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे.
अमित गोरखे यांनी पत्रात म्हटले आहे की शाळा मुलांच्या सुरक्षेसाठी फायर सेफ्टीसारख्या महत्त्वपूर्ण नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, परंतु फी वाढवल्याने शाळांवर अनावश्यक आर्थिक ताण येतो. शाळांची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन फी वाढवणे योग्य नाही. फायर सेफ्टी नूतनीकरणच्या फी ची वाढ रद्द करण्याची विनंती केली आहे. त्यांनी असेही सांगितले आहे की, शाळांमध्ये अग्निशामक उपकरणे, धूर बाहेर काढणारे यंत्रणा आणि आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग यासारख्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे, परंतु यासाठी अनावश्यक फी वाढणे टाळले पाहिजे. सर्व शाळा फायर सेफ्टी नियमांचे पूर्ण पालन करण्यासाठी कटिबद्ध आहेत, पण फी वाढवल्यामुळे सर्वाच शाळांवर आर्थिक भार वाढतो. ही फी वाढ रद्द झाल्यास शाळा संस्थाना मोठा दिलासा मिळेल. महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या मागणीचा विचार करून शाळांच्या हिताच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घ्यावा, असे अमित गोरखे यांनी पत्रात म्हटले आहे.