सांगवी (Pclive7.com):- जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कुल व भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी बालचमुंचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेचा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला होता. शाळेविषयी आपुलकी आणि आवड निर्माण व्हावी, यासाठी ‘माय फर्स्ट डे ऍट स्कूल’ हा उपक्रम राबविण्यात आला.
शाळेमध्ये प्रवेश करणारे बालक व त्यांना शाळेत सोडायला आलेले पालक यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी अरविंद सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, प्रशालेचे सचिव प्रणव राव, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवरच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते.
शाळेच्या पहिल्या दिवशी कोणत्याही प्रकारचे पुस्तकी शिक्षण न देता विद्यार्थ्यांकडून विविध ऍक्टिव्हिटी करून घेतल्या. विद्यार्थ्यांच्या फिंगरप्रिंट्सच्या माध्यमातून संस्थेच्या सिम्बॉलची व ब्रीदवाक्याची ओळख करून देण्यात आली. प्रवेशद्वारावर फुलांची आरास, रांगोळी, फलकलेखन करून वातावरण प्रफुल्लित केले होते. विद्यार्थी जणू आपण सेलिब्रेटीच आहोत, अशा थाटात वावरत होते. विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉईंट ठेवण्यात आला होता. तसेच मुलांना चॉकलेट व स्माइली स्टिकर्स देण्यात आली. पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये मुलांसमोर नमस्ते, थम्, हात मिळवणे अशी अनेक चित्रे ठेवण्यात आली होती. विद्यार्थी ज्या चित्रावर हात ठेवत तशी कृती शिक्षक करत. अभ्यास विरहित शाळा उपक्रम राबविण्यात आला.
आरती राव म्हणाल्या, की जून महिना म्हटलं की मृग नक्षत्र व पावसाला सुरुवात होते, ज्याप्रमाणे नैसर्गिकरीत्या ग्रामीण व्यक्तीच्या आयुष्यात चेतना निर्माण करणारा दिवस असतो. तसाच विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात त्यांचे आयुष्य घडवणारा दिवस म्हणजे त्यांच्या शाळेचा पहिला दिवस. त्यांच्या जीवनाला एक दिशा व आकार देणारा दिवस आहे. प्रणव राव यांनी बालचमुंना चालू शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. आशा घोरपडे व नीलम पवार यांनी विद्यार्थ्यांना शालेय शिस्त व नियम याविषयी माहिती दिली.