मानधनामध्ये एकूण १० टक्के वाढ; २०४ कर्मचाऱ्यांना फायदा; महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची स्थायी समितीमध्ये मान्यता
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका प्राथमिक शिक्षण विभागात काम करणाऱ्या २०४ बालवाडी शिक्षक व सेविका यांना महापालिका प्रशासनाकडून ‘मान्सून गिफ्ट’ मिळाले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना मानधनामध्ये १० टक्के वाढ देण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीमध्ये मंजुरी देण्यात आली.
महापालिका शिक्षण विभागाच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षण विभागात सध्या २०४ बालवाडी कार्यरत आहेत. या बालवाड्यांमध्ये १९२ शिक्षिका, १ मुख्य समन्वयक, ८ समन्वयक आणि ३ बालवाडी सेविका असे २०४ कर्मचारी मानधन तत्वावर काम करीत आहेत.
संबंधित कर्मचाऱ्यांची मानधनामध्ये दर दोन वर्षांनी मानधनाचे १० टक्के वाढ करण्याबाबत २०२१ मध्ये मान्यता देण्यात आली आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये सदर कर्मचाऱ्यांच्या सेवेची दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे ऑक्टोबर २०२३ पासून संबंधितांना मानधनामध्ये वाढ करणे अपेक्षीत होते. याबाबत भाजपा आमदार महेश लांडगे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले असून, महापालिका स्थायी समितीमध्ये संबंधित प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली आहे.
बालवाडीमध्ये शिकणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचे कर्तव्य बालवाडी शिक्षिका व सेविका करीत आहेत. दोन वर्षांच्या सेवेनंतर १० टक्के मानधनामध्ये वाढ करावी, असा निर्णय झाला आहे. पण, २०२३ पासून या निर्णयाची अंमलबजावणी तांत्रिक बाबींमुळे झाली नाही. याबाबत प्रशासनाला सूचना केली होती. त्यामुळे २०४ बालवाडी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.
Tags: पिंपरी चिंचवड महापालिका