पिंपरी (Pclive7.com):- आईमुळे मिळणारा हा पहिलाच पुरस्कार आहे. त्यामुळे या पुरस्काराचे महत्व वेगळे आहे. भावना व्यक्त करण्यासाठी शब्दच नाहीत, असे मत पुरस्कार्थी उज्जैनचे जिल्हाधिकारी संकेत भोंडवे यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.
चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड विभाग आणि श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय, चिंचवड यांच्या वतीने देण्याच आला. श्यामची आई व श्याम पुरस्कार यावर्षी उज्जैनचे जिल्हाधिकारी संकेत भोंडवे व त्यांच्या आई सुमन शांताराम भोंडवे यांना ज्येष्ठ समाजवादी विचारवंच भाई वैद्य यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त विभागीय आयुक्त दिलीप बंड, आदर्श गाव प्रकल्प योजनेचे अध्यक्ष पोपटराव पवार, रामचंद्र जाधव आदी उपस्थित होते. पुरस्काराचे स्वरुप श्यामची आई पुस्तक व गौरवचिन्ह असे होते.
सानेगुरुजी यांनी लिहिलेले ‘श्यामची आई’ हे मातृप्रेमावर आधारित पुस्तक आहे. त्या नावाने मिळणारा हा पुरस्कार खूप महत्त्वाचा आहे. यापूर्वी मला राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या हस्ते पुरस्कार मिळाले आहेत. मात्र, आईमुळे मिळणारा हा पहिलाच पुरस्कार आहे. त्यामुळे या पुरस्काराचे महत्त्व वेगळे आहे. खरे तर भावना व्यक्त करायला शब्दच नाहीत.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड विभाग आणि श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय, चिंचवड यांच्या वतीने देण्यात येणारे ‘श्यामची आई’ व ‘श्याम’ पुरस्कार यंदा उज्जैनचे जिल्हाधिकारी संकेत भोंडवे व त्यांच्या आई सुमन शांताराम भोंडवे यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरुप श्यामची आई पुस्तक व गौरवचिन्ह असे होते.
श्यामची आई पुरस्कार मिळालेल्या सुमन भोंडवे म्हणाल्या, ‘श्यामची आई’ पुरस्कार जाहीर झाल्याने खूप आनंद झाला आहे. माझे पती शांताराम भोंडवे यांनी कलागुणांना दिलेले प्रोत्साहन आणि आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारामुळे माझी चांगली जडणघडण झाली. कोणत्याही कामाचा आळस न करता, ‘नाही’ हा शब्द बाजूला ठेवून मी सतत प्रयत्न करीत राहिले. हा पुरस्कार जाहीर झाल्याने मुलांवर केलेले संस्कार सार्थकी लागले, असे वाटते. प्रत्येक घरात ‘श्यामची आई’ असते आणि ती ‘श्याम’ घडवू शकते. मात्र, त्यासाठी प्रत्येक घरातील ‘श्याम’ने ‘श्यामच्या आई’चे ऐकले पाहिजे.
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कष्ट, जिद्द, आत्मविश्वास आणि आई-वडील व गुरुजनांचे आशीर्वाद महत्वाचे असतात. हा पुरस्कार जाहीर झाल्याने मुलांवर केलेले संस्कार सार्थकी लागले, असे वाटते. प्रत्येक घरात ‘श्यामची आई’ असते आणि ती ‘श्याम’ घडवू शकते. मात्र, त्यासाठी प्रत्येक घरातील ‘श्याम’ने ‘श्यामच्या आई’चे ऐकले पाहिजे असे गौरवोउद्गार सुमन भोंडवे यांनी व्यक्त केले. आजचा पुरस्कार ख-या अर्थाने माझे पती कै. शांताराम भोंडवे यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.
विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी अध्यक्षीय भाषणात म्हणाले, प्रशासनाकडे आलेला कागद इथून पुढे कोणाच्याही पाठपुराव्याशिवाय विशिष्ट कालमर्यादेत पूर्ण करून स्वच्छ व तत्पर प्रशासन निर्माण करून जनतेची कामे तात्काळ करून नवे आनंददायी प्रशासन घडवू असा मंत्र आज विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिला. शासकीय कार्यालायातील कामाबाबत सर्वसामान्य माणूस कमालीचा उदासीन असतो.
शासकीय कार्यालयात प्रलंबित फायलींचे गठ्ठेच्या गठ्ठे वर्षानुवर्षे पडून असल्याचे चित्र असते. पण हे सर्व चित्र बदलून स्वच्छ आणि गतिमान प्रशासन करावयाचे आहे. दि. १५ फेब्रुवारीपासून झिरो पेंडन्सी मोहिम हाती घेतली असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काम वेगात सुरु आहे. दररोज येणा-या फाईलला लिपिकाच्या टेबलपासूनच गती मिळाली आहे.
यावेळी डॉ.डी. वाय, पाटील विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, संकेत भोंडवे हा कॉलेजचाच विद्यार्थी आहे. त्याबद्दल खूप अभिमान आहे. एवढ्या लहान वयात एवढे पुरस्कार मिळाले. याबाबत कौतुक वाटते. पिंपरी-चिंचवडचा चेहरा मोहरा मोठ्या प्रमाणात बदलेला आहे. शिक्षणाची पद्धत बदलली आहे. बाहेरील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
यावेळी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य, विभागीय निवृत्त आयुक्त दिलीप बंड, आदर्शगाव प्रकल्प योजनेचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले. सूत्रसंचालन अनिल कातळे यांनी केले. आभार राजेंद्र वाघ यांनी मानले.





















Join Our Whatsapp Group