सांगवी (Pclive7.com):- अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं ही मागणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त होऊ लागली आहे. यासाठी थेट केक वर…”मी अजित आशा अनंतराव पवार महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो की..” असा उल्लेख करण्यात आला आहे. हा केक स्वतः अजितदादांनी कापत या शुभेच्छांचा स्विकार ही केला. पिंपरी चिंचवडच्या सांगवीतील आदिराज शितोळे आणि समर्थकांनी वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री पदासाठी अशा शुभेच्छा दिल्या आहेत. राजकीय वर्तुळात या केकची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा उद्या (दि.२२) रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसांच्या निमित्ताने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एक दिवस आधीच शुभेच्छा मिळतानाच चित्र दिसून येत आहेत. अशातच अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी या निमित्ताने होत असल्याचं चित्र आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे आज पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी त्यांच्या समर्थकांनी सांगवी येथे वाढदिवसाच्या एक दिवस आधीच केक कापत त्यांचा जन्मदिवस साजरा केला. पण यावेळी चर्चा सुरू झाली ती त्यांच्या केकची. अजित पवारांसाठी आणलेल्या केकवरती ‘मी अजित आशा अनंतराव पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…!’, असं लिहण्यात आलेलं होतं.
अजितदादांसाठी आणलेल्या या केकची सध्या जोरदार चर्चा झाली आहे. अजित पवारांना त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आगामी काळात मुख्यमंत्री पद मिळावं अशा शुभेच्छा त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक देताना दिसून येत आहेत. राज्यात अनेकदा त्यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर देखील लावलेले दिसून आले होते. मात्र, सध्या या केकची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी आणलेला हा केक स्वतः अजित दादांनी कापत या शुभेच्छांचा स्वीकार ही केला. पिंपरी चिंचवडच्या सांगवीतील आदिराज शितोळे आणि समर्थकांनी वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.