पिंपरी (Pclive7.com):- भारतीय रेल्वेच्या पुणे विभागातील उपनगरीय रेल्वे सेवेला ४८ वर्षे पूर्ण झाली असून ११ मार्च २०२६ रोजी ईएमयू (EMU) लोकल सेवेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला सिनिअर डीईई दिपक भाटी, डेपो इंचार्ज बी. दामोदर, रजत सोनावले, पानीग्रही, विशाल माने, सागर भिल आणि बाळासाहेब टोणे उपस्थित होते.

पुणे विभागातील ईएमयू सेवेची सुरुवात ११ मार्च १९७८ रोजी पुणे ते लोणावळा दरम्यान पहिली ‘इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट’ लोकल धावू लागल्यानंतर झाली. या उपक्रमामुळे विजेवर चालणाऱ्या उपनगरीय रेल्वेचा प्रारंभ झाला आणि प्रवाशांना अधिक जलद व सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन २००९ मध्ये १२ डब्यांच्या ईएमयू गाड्या सुरू करण्यात आल्या. पहिली १२ डब्यांची सेवा २३ मार्च २००९ रोजी सुरू झाली, तर दुसरी सेवा १६ एप्रिल २००९ रोजी सुरू करण्यात आली. त्याच वर्षी AC-DC १२ डब्यांच्या ईएमयू गाड्याही टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्या. त्यानंतर १० डिसेंबर २००९ रोजी एसी ट्रॅक्शन लाईन कार्यान्वित करण्यात आली.
२०११ मध्ये आधुनिक AC १२ डब्यांची ईएमयू (ICF) सेवा सुरू करण्यात आली. पुढे २०१७ मध्ये आधुनिक सीमेन्स (Siemens) ईएमयू रेक दाखल झाल्यानंतर प्रवाशांच्या प्रवासात अधिक आराम आणि विश्वासार्हता वाढली. १८ नोव्हेंबर २०१९ रोजी ईएमयू रेकसाठी ‘IA मेंटेनन्स शेड्यूल’ लागू करण्यात आले, ज्यामुळे उपनगरीय सेवांच्या सुरक्षिततेत वाढ झाली. तसेच ६ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवाजीनगर येथे ईएमयू टर्मिनस सुरू करण्यात आले.
गेल्या ४८ वर्षांत पुणे–लोणावळा दरम्यानची ईएमयू सेवा हजारो विद्यार्थी, कर्मचारी आणि प्रवाशांसाठी जीवनवाहिनी ठरली आहे. १९७८ मधील पहिल्या विद्युत लोकलपासून ते आजच्या आधुनिक रेक्सपर्यंत पुणे रेल्वे विभागाने उपनगरीय रेल्वे वाहतूक अधिक मजबूत केली आहे.
दरम्यान, रेल्वे प्रवासी मयुरेश जव्हेरी यांनी सांगितले की, पुणे–लोणावळा मार्गावर स्वयंचलित सिग्नल यंत्रणा सुरू होऊन अनेक वर्षे झाली असली तरी लोकल गाड्यांची संख्या वाढलेली नाही. कर्जत–कल्याण मार्गावर जसे १० ते १५ मिनिटांच्या अंतराने लोकल धावतात, त्याच धर्तीवर पुणे–लोणावळा लोकलची संख्या वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली.
तर रेल्वे प्रवासी संघाचे माजी अध्यक्ष ईक्बाल (भाईजान) मुलाणी यांनी सांगितले की, पुणे–लोणावळा चौपदरीकरण प्रकल्पासाठी राज्य सरकारने एमआरव्हीसीला आर्थिक वाटा देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयानेही हा प्रकल्प लवकर सुरू करून भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि प्रवासी ताण लक्षात घेता हा प्रकल्प तातडीने पूर्ण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.






















Join Our Whatsapp Group