जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस-भाजप-शिवसेना-आरपीआय (आठवले) मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत सोमवारी (दि. २८) रोजी विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात निवडणूक अधिकारी अर्चना यादव यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे.
यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल, खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना शिंदे गटाचे उपनेते इरफान सय्यद, भाजपकडून आमदार अमित गोरखे, उमा खापरे उपस्थित होते.
दरम्यान मतदार संघातून निघताना मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि मतदार संघातील नागरिक स्वयंस्फूर्तीने आमदार बनसोडे यांच्यासोबत होते. विशेषतः महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी रस्त्यांच्या दुतर्फा उभे राहून तसेच घरांच्या छतावरून नागरिक हे अण्णा बनसोडे यांच्यावर पुष्पवृष्टी करीत होते. नागरिकांचा हा उत्स्फूर्त उत्साह आणि कार्यकर्त्यांची गर्दी पाहून आमदार बनसोडे यांचे हृदय भरून आले. अर्ज भरल्यानंतर बनसोडे यांनी सहभागी महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पिंपरी विधानसभेतील नागरिकांचे मनापासून आभार व्यक्त केले. तसेच मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी येत्या २० तारखेला भरभरून मतदान करा, असं आवाहन बनसोडे यांनी यावेळी केलं आहे.
माध्यमांशी संवाद साधताना आमदार बनसोडे म्हणाले, ‘महायुतीच्या सर्वच घटक पक्षाकडून मला पाठींबा मिळाला आहे. पिंपरी विधानसभेतील जनता माझ्या कामावर समाधानी आहे. माझ्यासह महायुतीचे सर्वच उमेदवार निवडून येतील याची मला खात्री आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून मी पक्षाचे काम करीत आहे. नव्या उमेदीने पक्षाचे काम चालू ठेवले. या कार्याची दखल घेऊन पक्षाने माझ्यावर पुन्हा विश्वास व्यक्त केला. जुन्या वादांवर आता पडदा पडला आहे. पक्षातील सर्व मित्र, पदाधिकारी आणि कार्यकर्ते माझ्याबरोबर कायम आहेत. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे.