पिंपरी (Pclive7.com):- राज्यातील सुमारे ५६ हजार रास्त भाव धान्य दुकानदार (रेशन दुकानदार) शुक्रवारपासून (दि.१) धान्याची उचल आणि वितरण थांबविणार होते. विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्याचे नियोजन होते. मात्र, राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांसमवेत झालेल्या बैठकीनंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
रेशन दुकानदारांना धान्यावरील मार्जीनमध्ये वाढ हवी आहे. त्याशिवाय, त्यांच्या विविध प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांबाबत ऑल महाराष्ट्र फेअरप्राईज शॉपकिपर्स फेडरेशन आणि अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ यांच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले होते. सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी दोन्ही संघटनांच्या केवळ पाच सदस्यांच्या उपस्थितीत रेशन दुकानदारांच्या समस्यांच्या सोडवुणकीसाठी बैठकीचे नुकतेच आयोजन केले होते. आचारसंहितेचे पालन करून ही बैठक घेण्यात आली.
आचारसंहिता सुरू असल्याने रेशन दुकानदारांना हव्या असलेल्या मार्जीन वाढीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार प्रशासनाला नाहीत. मात्र, राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या दोन आठवड्यामध्ये पुरवठा विभागामार्फत राज्यातील रेशन दुकानदारांच्या दोन्ही संघटनांची नवनियुक्त अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांसोबत संयुक्त बैठक घेण्यात येईल. तसेच, हा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे.
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेण्याची विनंती अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी केली होती. त्यामुळे काही कालावधीसाठी आंदोलन स्थगित करण्याचा ठराव बैठकीमध्ये दोन्ही संघटनांच्या वतीने एकमताने पारित करण्यात आला. त्यामुळे धान्याची उचल व वितरण सुरळीत होऊन ते लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना वेळेत पोहचविण्यात येणार आहे.
– विजय गुप्ता, कोषाध्यक्ष, ऑल महाराष्ट्र फेअरप्राईज शॉपकीपर्स फेडरेशन.