पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने सोमवारी पहाटे कुदळवाडी आणि परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर बुलडोझर कारवाई केली. या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी प्रतिक्रिया देत, “देशविघातक प्रवृत्तींना आश्रय देणाऱ्या बेकायदेशीर प्रार्थनास्थळांवर कारवाई होणे आवश्यक होते. राष्ट्र सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असे स्पष्ट केले.

महेश लांडगे म्हणाले की, या कारवाईदरम्यान काही हिंदू धार्मिक स्थळांचेही नुकसान झाल्याची खंत आहे. मात्र, संबंधित स्थळे अधिकृत जागी आणि नियमानुसार पुनर्स्थापित करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी पुढे नमूद केले की, राष्ट्र सुरक्षा, इंद्रायणी नदी प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने फेब्रुवारी २०२५ मध्ये या भागात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ही कारवाई करण्याचे धाडस दाखवले, असेही त्यांनी म्हटले.

कुदळवाडी परिसर आगामी काळात अतिक्रमणमुक्त करून ‘ग्रोथ हब’ म्हणून विकसित करण्याचा शासनाचा मानस असल्याचे सांगताना लांडगे यांनी, “कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. देशविघातक प्रवृत्तींना आश्रय देणाऱ्या कोणत्याही बेकायदेशीर बांधकामाला आम्ही समर्थन देणार नाही,” अशी ठाम भूमिका मांडली.
तसेच, परिसरातील नागरिकांनी कोणताही धार्मिक तणाव निर्माण न करता पोलीस आणि महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.“जय श्रीराम… जय संविधान…!” अशा घोषवाक्यासह त्यांनी आपली प्रतिक्रिया समाप्त केली आहे.





















Join Our Whatsapp Group