अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेचा २१ व्या वर्धापन दिन उत्साहात साजरा
तळेगाव दाभाडे (Pclive7.com):- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेते ओंकार राऊत आणि अभिनेत्री अभिज्ञा भावे यांना ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांच्या हस्ते ‘कलागौरव’ पुरस्काराने, तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार वाळंज यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निमित्त होते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या २१ व्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे.

नाना भालेराव कॉलनीमध्ये झालेल्या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. विश्वास पाटील, अभिनेत्री सविता मालपेकर, राजन भिसे, नगराध्यक्ष संतोष दाभाडे, उपनगराध्यक्ष गणेश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, नाट्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे, बबनराव भेगडे, राजन लाखे, नीलम शिर्के – सामंत, विलास काळोखे, नाट्य परिषदेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या २१ व्या वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नाट्य परिषदेच्या वाटचालीची चित्रफीत दाखवण्यात आली. ‘परंपरा महाराष्ट्राची’ अभंग ते लावणी या सांस्कृतिक कार्यक्रमाने कलात्मक उंची वाढवली.

खासदार बारणे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा देताना सांगितले, तळेगावच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये नाट्य परिषदेचे मोठे योगदान आहे. डॉ. विश्वास पाटील यांनी तळेगावच्या सांस्कृतिक परंपरेचे कौतुक केले. शिवाजी साटम यांनी नाट्यशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. आजपर्यंत आम्ही जे काही कमावले आहे, ते नाट्यशिक्षणामुळेच. भाऊसाहेब भोईर म्हणाले, की कोणत्याही शहराची उंची केवळ इमारतीवरून मोजता येत नाही, तर त्या शहरात सामाजिक, सांस्कृतिक चळवळी किती सक्रिय आहेत, यावरून मोजता येते. नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी आगामी दोन-तीन वर्षांत नियोजित नाट्यगृह पूर्ण करण्याची ग्वाही दिली.
दरम्यान, नयना डोळस व बालकलाकारांचा यावेळी गौरव करण्यात आला. आकाश थिटे यांनी सूत्रसंचालन, तर दीपक बाळसराफ यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वास देशपांडे, संजय वाडेकर, दीपक बाळसराफ, नितीन शहा, चंद्रकांत भिडे, हरिश्चंद्र गडसिंग, दादा उऱ्हे, सचिन धनवे, उमेश महाजन, तानाजी मराठे, मयूर राजगुरव, राजेश बारणे, बसप्पा भंडारी, दीपाली पाटील, वैशाली लगाडे, फाल्गुनी भाटिया, डॉ. सोरटे यांनी परिश्रम घेतले.




















Join Our Whatsapp Group