पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित छत्रपती संभाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाला उत्साहात सुरुवात
पिंपरी (Pclive7.com):- ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय…’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय…’, ‘जय भवानी, जय शिवाजी….’ च्या जयघोषात आणि स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या नेत्रदीपक दृश्यांनी चिंचवड येथील छत्रपती संभाजीनगर परिसरातील बर्ड व्हॅली उद्यानाच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या मैदानाचा परिसर अक्षरशः दुमदुमून गेला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज विचार प्रबोधन पर्वा’अंतर्गत सादर करण्यात आलेल्या ‘शिवरूद्र शंभुराजे’ या भव्य महानाट्याच्या पहिल्या प्रयोगाला शिवप्रेमींनी प्रचंड प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

या प्रबोधन पर्वाचे उदघाटन उपमहापौर शर्मिला बाबर,आयुक्त डाॅ.विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते तर माजी महापौर मंगला कदम, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, तसेच क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले यावेळी नगरसदस्य तुषार हिंगे, कुशाग्र कदम, मंदार देशपांडे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, योगिता नागरगोजे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, शिव शंभू शाहू जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष संजय कुरबेट्टी, उपाध्यक्ष हेमा पारिसकर, संभाजी ब्रिगेडचे प्रविण कदम, सतीश काळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर म्हणाले, त्यागाचे सर्वात मोठे उदाहरण ‘छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या जयंतीनिमित्त भव्य-दिव्य सोहळा शहरात होत आहे ही अभिमानाची बाब आहे. असे आवाहन देखील त्यांनी केले.
छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान व प्रेरणा अशा महोत्सवांमधून लोकांपर्यंत पोहोचत आहेत,या कार्यक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक प्रसंग अनुभवण्यासाठी शहरातील नागरिकांनी या महानाट्यास उपस्थित रहावे असे आयुक्त डाॅ.विजय सुर्यवंशी म्हणाले.

उदघाटन कार्यक्रमानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवस्पर्श शिवसह्याद्री प्रतिष्ठान निर्मित, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर, विनय चंद्रकांत दाभाडे लिखित, दिग्दर्शित व प्रतिक चंद्रकांत दाभाडे सह-दिग्दर्शित भव्य महानाट्याच्या प्रयोगाला सुरुवात झाली. या प्रयोगात सुमारे २०० हून अधिक कलाकारांनी सहभाग नोंदवत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रसंग जिवंत केले. घोडे, उंट, भव्य नेपथ्य, पारंपरिक वेशभूषा, अत्याधुनिक प्रकाशयोजना, प्रभावी ध्वनीसंयोजन आणि नेत्रदीपक आतषबाजीच्या सहाय्याने उभारण्यात आलेल्या प्रत्येक दृश्याला उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महानाट्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग, राज्याभिषेक तसेच छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म, बालपण, राज्याभिषेक व संघर्षमय जीवनप्रवास आणि स्वराज्य रक्षणासाठी दिलेले बलिदान यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे, या महानाट्यातून उपस्थितांना हे प्रसंग अनुभवायला मिळाले.
कार्यक्रमस्थळी नागरिकांसाठी सुयोग्य बैठक व्यवस्था, अग्निशामक वाहन, रूग्णवाहिका, सुरक्षा व्यवस्था तसेच आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
दरम्यान, ‘शिवरूद्र शंभुराजे’ या महानाट्याचे आणखी दोन प्रयोग ११ व १२ मे २०२६ रोजी याच ठिकाणी सायंकाळी ६.३० वाजता सादर करण्यात येणार असून,नागरिकांनी या भव्य महानाट्य प्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.




















Join Our Whatsapp Group