पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी ते निगडी दरम्यान सुरू असलेल्या पुणे मेट्रोच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना टळल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. वादळी वाऱ्यामुळे मेट्रो मार्गावरील कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडचे पत्रे उडून थेट जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर पडल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी उन्हापासून बचावासाठी तात्पुरते पत्र्याचे शेड उभारण्यात आले होते. मात्र, वादळी वाऱ्याच्या झोतामुळे हे पत्रे अचानक उडून रस्त्यावर आले. त्याचवेळी अनेक दुचाकीस्वार आणि वाहनचालक या मार्गावरून प्रवास करत होते.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मोबाईलवर बोलत जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराच्या समोरच एक मोठा पत्रा जोरात आदळला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तो चालक घाबरला. काही सेकंदांचा फरक पडला असता तर गंभीर अपघात होण्याची शक्यता होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या घटनेनंतर नागरिकांनी पुणे मेट्रो प्रशासनाच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कामाच्या ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त करण्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांनी आणि कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर पडलेले पत्रे बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. पुणे मेट्रो प्रशासनाकडून या घटनेबाबत अधिकृत प्रतिक्रिया अद्याप देण्यात आलेली नाही.




















Join Our Whatsapp Group